उजनीतून 3 महिन्यात 36 टन ‘सकर’ मासा हद्दपार : देशी माशांना वाचवण्यासाठी बीएनएचएसची ‘मिशन सकर’ मोहीम यशस्वी
(निलेश गायकवाड)
भिगवण : प्रतिनिधी
उजनी जलाशयातील स्थानिक माशांच्या अस्तित्वाला मोठा धोका बनलेल्या परकीय ‘सकर’ माशाच्या उच्चाटनासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने उचलले पाऊल यशस्वी होत आहे. अवघ्या तीन महिन्यात 36 हजार किलो म्हणजेच 36 टन सकर मासा जलाशयातून बाहेर काढण्यात आला आहे.
नेमके काय आहे ‘मिशन सकर’?
उजनीत काही वर्षांपूर्वी पोहोचलेला हा सकर मासा मूळचा दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदी खोऱ्यातील आहे. शोभेचा मासा म्हणून आणला गेला असला तरी आज त्याने उजनीच्या संपूर्ण परिसंस्थेवर आक्रमण केले आहे.
हा मासा अत्यंत आक्रमक आहे. तो रोहू, कतला, मृगल, चिलपी यांसारख्या देशी माशांच्या अंडी आणि पिल्ले मोठ्या प्रमाणात खातो. एका मादी सकर एका वेळी 70 ते 80 हजार अंडी घालू शकते. त्यामुळे देशी माशांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
हा धोका ओळखून बीएनएचएस आणि स्थानिक मच्छीमार संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली.
मच्छीमारांना आर्थिक प्रोत्साहन
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ निर्मूलन नाही तर मच्छीमारांना रोजगाराची संधी.
सकर माशाचे काटे आणि कवच जाळे फाडतात, त्यामुळे तो पकडला तरी बाजारात भाव मिळत नव्हता आणि परत पाण्यात सोडला जात होता.
यावर उपाय म्हणून बीएनएचएसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उमेश काटवटे आणि अंबिका फिश को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष भरत मल्लाव यांनी पुढाकार घेतला. योजनेनुसार मच्छीमारांकडून सकर मासा 30 ते 34 रुपये प्रति किलो दराने खरेदी केला जात आहे. त्यावर 2 रुपये प्रति किलो अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता दिला जात आहे. त्यामुळे मच्छीमार आता उत्साहाने हा मासा पकडून बाहेर काढत आहेत.
देशासाठी आदर्श ठरणारी मोहीम
पर्यावरण संवर्धन आणि मत्स्यसंपदा वाचवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने राबविलेली ही देशातील पहिली व्यापक निर्मूलन मोहीम आहे. आतापर्यंतचे निकाल उत्साहवर्धक आहेत.
डॉ. उमेश काटवटे म्हणाले, “सकर मासा ही उजनीच्या परिसंस्थेला लागलेली वाळवी आहे. या मोहिमेमुळे देशी माशांचे संरक्षण होण्यासोबतच मच्छीमारांनाही शाश्वत रोजगाराची संधी मिळत आहे.”
अंबिका फिश को-ऑपरेटिव्हचे अध्यक्ष भरत मल्लाव म्हणाले, “पूर्वी सकर जाळ्यात आला की आर्थिक नुकसान व्हायचे. आता किलोला मोबदला मिळत असल्याने मच्छीमार उत्पूर्णपणे हा मासा बाहेर काढत आहेत.”
पुढील 2 ते 3 वर्षे ही मोहीम सातत्याने राबवून उजनीतून सकरचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.