“गरीबांच्या ताटात निकृष्ट अन्नधान्य; पुरवठा यंत्रणेवर प्रहार संघटनेचा हल्लाबोल”
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (रेशन) वितरित होणाऱ्या अन्नधान्याच्या गुणवत्तेबाबत प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गोरगरीब नागरिकांना मिळणारे गहू, तांदूळ व मका निकृष्ट दर्जाचा असून ते मानवी आरोग्यास योग्य नसल्याचा आरोप त्यांनी केला. अशा दर्जाहीन धान्यामुळे गरीबांच्या लेकरांना काय खाऊ घालायचे, असा संतप्त सवाल उपस्थित करत पुरवठा विभाग, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली.
पाटील यांनी पुरवठा विभागाच्या गोदामांपासून ते रेशन दुकानांपर्यंत संपूर्ण साखळीची तपासणी करण्याची मागणी केली आहे. अन्नधान्याची गुणवत्ता तपासूनच त्याचे वितरण करावे, अन्यथा निकृष्ट धान्याचा पुरवठा त्वरित थांबवावा, असे ते म्हणाले. तसेच स्थानिक आमदार अनिल पाटील. आमदार, खासदार, स्मिता वाघ. मंत्री. गुलाबराव पाटील. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः हेच अन्नधान्य आपल्या कुटुंबात वापरून पाहावे, तेव्हाच गरीबांच्या वेदना समजतील, असा टोला त्यांनी लगावला.
गरीबांच्या ताटात दर्जेदार अन्नधान्य पोहोचणे ही शासनाची जबाबदारी असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचे निकष काटेकोरपणे पाळले जावेत, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे. निकृष्ट धान्याचा पुरवठा सुरू राहिल्यास गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ येऊ शकते, असा इशाराही संतोष पाटील यांनी देत शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.