मोहिनीराज संगीत विद्यालयाचा ‘गजर हरिनामाचा’ भक्तिरसात संपन्न..
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव
आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मोहिनीराज संगीत विद्यालय, शिरपूर यांच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून आयोजित “गजर हरिनामाचा – एक सांगीतिक हरिनाम उत्सव” हा भक्तिमय कार्यक्रम श्री दत्त मंदिर (गाडगीळ परिवार), परशुराम चौक, मारवाडी गल्ली, शिरपूर येथे उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री दत्तात्रेय पूजन व संत परंपरेच्या स्मरणाने झाली. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आदी संतांच्या अभंगांसह मराठीतील सुश्राव्य भक्तिगीते सादर करून उपस्थितांना भक्तिरसात तल्लीन केले.
संगीत अलंकार सौ. मनाली सुघोष उपासनी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध अभंग आणि रागांचे सादरीकरण केले. यामध्ये चि. वरद जोशी, चि. प्रथमेश जोशी, सौ. भावना पाटील, सौ. शुभांगी माळी, कु. वेदश्री सावळे, कु. वेदिका मीठभाकरे, कु. हेमांगी जैन, सौ. मनीषा राजपूत तसेच सौ. मनाली उपासनी यांनी आपल्या सुरेल गायनाने कार्यक्रमाची रंगत वाढविली.
कार्यक्रमाला श्री चैतन्य आमले यांची हार्मोनियमवर तर ह.भ.प. जितेंद्र महाराज (विखरण) यांची तबल्यावर सुरेल साथ लाभली. त्यामुळे संपूर्ण वातावरण हरिनामाच्या गजराने भारावून गेले. उपस्थित नागरिक, भाविक, पालक व संगीतप्रेमींनी कलाकारांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद देत टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले.
अभंगांचे निरूपण आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे संचालक श्री. सुघोष उपासनी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गाडगीळ परिवार यांनी श्री दत्त मंदिराचे सभागृह उपलब्ध करून दिले. तसेच सौ. मनीषा जोशी, श्रीकृष्ण जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या नियोजन, व्यवस्थापन, सजावट, ध्वनी व्यवस्था, वाद्यसामग्री, प्रसिद्धी, छायाचित्रण तसेच उपस्थित पालक, रसिक श्रोते, स्वयंसेवक आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांनी आभार मानले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक यशस्वी ठरल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपाला सर्वांनी एकमुखाने हरिनामाचा गजर करत समाजात भक्ती, संस्कार आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.