स्मार्ट मीटरच्या वाढत्या तक्रारी; ग्राहक पंचायतचे महावितरणला निवेदन
अमळनेर : विक्की जाधव
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ग्राहकांना येणाऱ्या वाढीव वीज बिलांच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर यांच्या वतीने महावितरण वीज कंपनी लिमिटेड, अमळनेर उपविभाग क्र. १ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय धांडे यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या ग्राहकांचे जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत, त्यांना पूर्वीच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट वीज बिले येत असल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत.
ग्राहक संरक्षण कायदा २०१९ तसेच वीज कायद्यानुसार ग्राहकांना योग्य माहिती, पारदर्शकता आणि निवडीचा अधिकार मिळणे आवश्यक आहे. मात्र स्मार्ट मीटरच्या प्रक्रियेत अपेक्षित पारदर्शकता दिसून येत नसल्याचा आरोप ग्राहक पंचायतने केला आहे.
यावेळी स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांना संपूर्ण माहिती देण्यात यावी, मीटरबाबत शंका असल्यास त्याची तपासणी कोणत्या अधिकृत प्रयोगशाळेत केली जाते याची माहिती सार्वजनिक करावी, मीटर अचूक असल्यास त्याचे तांत्रिक फायदे ग्राहकांना समजावून सांगावेत तसेच ग्राहकांच्या संमतीशिवाय जुने मीटर बदलू नयेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावर अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय धांडे यांनी ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी लवकरच जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात येईल व स्मार्ट मीटरबाबत सर्व माहिती पारदर्शकपणे देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
निवेदन देताना विजय शुक्ला, मकसूद बोहरी, सुनील वाघ, सतीश देशमुख, नरेंद्र बाळू पाटील, भाऊसाहेब देशमुख, दिलीप सारजे आणि सुभाष पाटील घोडगावकर उपस्थित होते.