“सत्तेपुढे जनतेचा जीव कवडीमोल?” पुरात अडकले सात्री गाव;”
“माणूस मेला की प्रशासन जागे होणार का.?”
अमळनेर : विक्की जाधव.
तापी नदीच्या पुराच्या विळख्यात सापडलेल्या अमळनेर तालुक्यातील सात्री गावातील गंभीर परिस्थितीवरून प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष शिवराम पाटील यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर शब्दांचा केला जोरदार प्रहार
पूरामुळे गावातील अनेक कुटुंबे घरातील संसारोपयोगी साहित्य बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत. मातीची घरे पावसाने भिजून कोसळण्याच्या उंबरठ्यावर असताना नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अशा वेळी प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करण्याऐवजी निष्क्रिय भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. “प्रशासकीय अधिकारी लोकसेवेसाठी आहेत की राजकीय दबावाखाली गप्पा ठोकण्यासाठी ?
“असा थेट प्रश्न उपस्थित करत यांनी काही लोकप्रतिनिधी अनिल पाटील आणि खा. स्मिता वाघ यांच्यामुळे पुरग्रस्तांचे पुनर्वसन रखडल्याचा गंभीर आरोप केला.
निवेदनात त्यांनी आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आणि अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. जनतेच्या जीवितापेक्षा सत्तेचे आणि पैशाचे राजकारण महत्त्वाचे ठरत असल्यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. “माणसांचे प्राण धोक्यात असताना प्रशासन जागे होत नसेल, तर त्या अधिकारांचा उपयोग काय? लोकांच्या अश्रूंवर सत्ता उभारणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, सहनशीलतेचा बांध फुटला तर त्याची किंमत मोठी मोजावी लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
शेवटी त्यांनी पुरग्रस्तांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पुनर्वसन, आवश्यक मदत आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी करत सरकारला प्रश्न केला आहे.