“रुग्णांच्या सुरक्षेसाठी डॉक्टर रस्त्यावर; सरकारने ऐकले नाही तर सर्व सेवा बंद!”
अमळनेर : विक्की जाधव
राज्यभरातील विविध वैद्यकीय संघटनांनी “Patient Safety First” या भूमिकेसह BHMS-CCMP नोंदणीला अंतिम न्यायालयीन निर्णय होईपर्यंत स्थगिती देण्याची मागणी करत आजपासून प्रांत अधिकारी अमळनेर यांना निवेदन देऊन बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), MARD, MSRDA, ASMI, MAGMO आणि इतर संघटनांनी एकत्र येत रुग्णांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशी ठाम भूमिका घेतली आहे. या आंदोलनाचा परिणाम अमळनेरसह राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील काही नियमित आरोग्य सेवांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डॉक्टर संघटनांचे म्हणणे आहे की, रुग्णांच्या जीविताशी संबंधित निर्णय घेताना न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत कोणतीही नवीन नोंदणी प्रक्रिया राबवू नये. रुग्ण सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवत आंदोलन करण्यात येणार असल्याचेही संघटनांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अमळनेरातील डॉक्टर संदीप जोशी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आमचे आंदोलन कोणत्याही व्यक्ती किंवा व्यवस्थेविरोधात नसून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आहे. सध्या केवळ ओपीडी सेवा बंद ठेवण्यात आली असून आपत्कालीन सेवा सुरू आहेत. मात्र, प्रशासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि योग्य निर्णय घेतला नाही, तर सर्व वैद्यकीय संघटना एकत्रितपणे आंदोलन अधिक तीव्र करतील. आवश्यक असल्यास सर्व वैद्यकीय सेवाही बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो.”
डॉक्टर संघटनांनी सरकारला तातडीने सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले असून, रुग्णहित आणि आरोग्य व्यवस्थेचे दीर्घकालीन संरक्षण लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. अमळनेरातील नागरिकांनी अत्यावश्यक नसलेल्या उपचारांसाठी रुग्णालयात जाण्यापूर्वी संबंधित सेवांची माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, सरकार आणि डॉक्टर संघटनांमध्ये लवकरात लवकर तोडगा निघावा, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
पत्रकार : विक्की जाधव. अमळनेर