अवघ्या दोन दिवसांत जवळपास ५१ लाख रुपयांच्या चोरीच्या घटना घडल्याने भिगवण परिसरातील सुरक्षेचा प्रश्न
(निलेश गायकवाड)
अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये तब्बल ५० लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरीला गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडसी कारवाया करत नागरिकांची झोप उडवली आहे. पोलिसांसमोर या दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
शुक्रवार (५ जून) ते शनिवार (६ जून) दरम्यानच्या मध्यरात्री म्हसोबावाडी येथे सेवानिवृत्त अधिकारी व शेतकरी भगवान श्रीपती नांदगुडे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून मोठा हात मारला. नांदगुडे दांपत्य रात्री हॉलमध्ये झोपलेले असताना चोरट्यांनी घराच्या बेडरूमच्या खिडकीची लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला.
सकाळी उठल्यानंतर घरातील लोखंडी कपाट, जुना फ्रीज आणि पोटमाळ्यावर ठेवलेली सुटकेस उघडलेली व अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आली. तपासणी केली असता फ्रीजमध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले सुमारे २७ तोळे सोन्याचे दागिने, एक किलो चांदीचे दागिने आणि १ लाख ९० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या चोरीतील एकूण ऐवजाची किंमत ४४ लाख ९० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
कुंभारगावात सव्वा सहा लाखांचा ऐवज लंपास
याचदरम्यान, ४ जून रोजी कुंभारगाव येथेही चोरट्यांनी दिवसाढवळ्ळ्या घरफोडी करत सुमारे ६.३३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. संजय ढोले हे आपल्या वृद्ध आईच्या शोधासाठी घराबाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरातील ४ लाख ४८ हजार ५३८ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, महिला बचत गटाची जमा झालेली दीड लाख रुपयांची रोख रक्कम तसेच वैयक्तिक वापरासाठी ठेवलेले ३५ हजार रुपये असा एकूण सव्वा सहा लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. दोन्ही घटनांप्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
सलग दोन दिवसांत झालेल्या या मोठ्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांत जवळपास ५१ लाख रुपयांच्या चोरीच्या घटना घडल्याने भिगवण परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.