करमाळा तालुक्यात वादळी वाऱ्याचा हाहाकार – देवळाली गावात घरांचे छत उडाले, शेतीचे प्रचंड नुकसान
करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा तालुक्यातील देवळाली गावात सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः थैमान घातले. या भीषण नैसर्गिक आपत्तीत अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर आले आहेत, तर शेती पिकांचेही अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. मागील आठ दिवसाखाली झालेल्या वादळी पावसात पारेवाडी येथील वृद्ध नवले दांपत्य अंगावर भिंत कोसळून मृत्यूमुखी पडले होते. सदरची घटना ताजी असतानाच
करमाळा तालुक्यातील सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा सुटला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, गावातील अनेक घरांवरील पत्रे कागदासारखे हवेत उडून लांबवर फेकले गेले. यामध्ये रोहिदास वाघ यांच्या घरावरचे पत्रे उडाल्याने घरातील लक्ष्मी रोहिदास वाघ आणि अनुष्का वाघ या दोघीजणी किरकोळ जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
वादळाचा फटका केवळ वाघ कुटुंबालाच नाही, तर संजय दामोदरे, दादा गाडे, प्रकाश दामोदरे, कल्याण अनंतराव कानगुडे, शरद चांदणे आणि आजिनाथ झोळे यांच्यासह अनेकांना बसला आहे. विशेषतः कल्याण कानगुडे यांच्या घरावरील पत्रे शंभर फूट दूर गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना रात्र पावसात बाहेर काढावी लागली. बस स्टँड परिसरातही वादळाचा मोठा प्रभाव जाणवला असून, झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्या आहेत. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वादळाचा मोठा तडाखा परिसरातील शेतीलाही बसला आहे. काढणीला आलेली पिके जमिनीदोस्त झाली असून फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. यातच शेतकरी शिवाजी सोमनाथ कानगुडे यांचा विक्रीसाठी ठेवलेला कांदा भिजल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच अनेक संकटांशी लढा देणारा बळीराजा या वादळामुळे पूर्णपणे खचला आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचे झालेले नुकसान भरून न येण्यासारखे आहे. प्रशासनाने या प्रकरणाची त्वरित दखल घेत बाधित घरांचे आणि शेतीचे तातडीने पंचनामे करावेत. तसेच, पीडित कुटुंबे आणि बाधित शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत द्यावी, अशी आग्रही मागणी देवळालीतील ग्रामस्थांकडून केली जात आहे.