बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट; कायदेविषयक जनजागृती, सायबर सुरक्षा व व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण

बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
आज दि. 09/06/2026 रोजी दुपारी 02.00 ते 03.00 या वेळेत जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक विद्यालय, बारामती, जि. पुणे येथील एकूण 105 विद्यार्थी व 10 शिक्षक यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट दिली. सदर भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना पोलीस विभागाचे कार्य, कायद्याचे महत्त्व, नागरिकांची कर्तव्ये, सायबर सुरक्षा, वाहतूक नियम, बाल संरक्षण, व्यसनमुक्ती, व्यक्तिमत्त्व विकास तसेच सुजाण नागरिकत्व या विविध विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांविषयीचा अनाठायी धाक दूर करून त्यांच्यात कायद्याविषयी आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील तक्रार कक्ष, पासपोर्ट पडताळणी विभाग, गोपनीय शाखा, मुद्देमाल कक्ष, लॉकअप रूम, चरित्र पडताळणी विभाग, तपास पथक, सीसीटीएनएस प्रणाली, स्टेशन डायरी तसेच विविध प्रशासकीय शाखांचे कामकाज प्रत्यक्ष दाखविण्यात आले. नागरिकांच्या तक्रारींची नोंद, गुन्ह्यांचा तपास, पुराव्यांचे जतन आणि विविध पोलीस सेवा कशा दिल्या जातात याची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘गुड टच – बॅड टच’ या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्यपान आणि इतर व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देण्यात आला.
वाहतूक सुरक्षेअंतर्गत रस्ता ओलांडण्याचे नियम, झेब्रा क्रॉसिंगचा वापर, वाहतूक सिग्नलचे महत्त्व, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना पोलीस विभागाकडे असलेल्या विविध शस्त्रांची माहिती देऊन त्यांचा वापर कायद्याच्या चौकटीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी कसा केला जातो हे समजावून सांगण्यात आले.
सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सोशल मीडिया, ऑनलाईन गेमिंग, फेक लिंक, ओटीपी फसवणूक, बनावट वेबसाईट, अकाउंट हॅकिंग आणि ऑनलाईन आर्थिक फसवणूक यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे आणि वैयक्तिक माहिती कोणालाही न देण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत शंकानिरसन केले.
पोलीस व नागरिक यांच्यात विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी तसेच सुरक्षित, शिस्तबद्ध आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनतर्फे अशा जनजागृतीपर उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हा उपक्रम पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल रामचंद्र चिवडशेट्टी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.