बुरशीयुक्त प्रसादाच्या तक्रारीनंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये; नमुने जप्त, दोषींवर कठोर कारवाईचे संकेत..
शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरात भाविकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरातील अनेक प्रसाद विक्री केंद्रांवर भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. काही भाविकांनी बुरशी लागलेल्या पेढ्यांबाबत तक्रारी केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) तातडीने अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
राज्याचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार विशेष पथकाने शिर्डीत धडक देत प्रसाद विक्री करणाऱ्या दुकानांवर छापेमारी सुरू केली आहे. पथकाकडून पेढ्यांचे नमुने गोळा करण्यात येत असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.
तपासणीत दोषी आढळणाऱ्या उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच प्रसाद विक्रेत्यांकडून पेढा उत्पादकांची माहितीही घेतली जात आहे.या कारवाईमुळे शिर्डीतील भेसळखोरांचे धाबे दणाणले असून साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर प्रशासनाचा फास अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे.