बारामतीत अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 55 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त, दुकानदार अटकेत

बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या अवैध विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 55 हजार 244 रुपयांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दुकान मालकाला अटक करण्यात आली असून संपूर्ण पुरवठा साखळीचा तपास सुरू करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी संदीप दिगंबरराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 233/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दिनांक 9 जून रोजी जळोची येथील विश्व एम्पायरमधील ‘धानेश्वरी किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स’ या दुकानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. कारवाईदरम्यान विविध ब्रँडच्या प्रतिबंधित उत्पादनांचा एकूण 55 हजार 244 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान दुकान मालक गणेश गुरुशांताप्पा गुरुभेट्टी (वय 38, रा. बारामती) याने हा माल कर्नाटक राज्यातून आणल्याची कबुली दिली. मात्र त्याबाबत कोणतीही वैध खरेदी कागदपत्रे किंवा बिले सादर करता आली नाहीत.
सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या या प्रतिबंधित अन्नपदार्थांचा पुनर्वापर किंवा पुनर्विक्री होऊ नये म्हणून संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे. आरोपी गणेश गुरुभेट्टी यास 10 जून रोजी अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पुरवठादार, वाहतूकदार, वितरक आणि उत्पादक यांच्याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात केवळ किरकोळ विक्रेत्यांपुरता तपास मर्यादित न ठेवता राज्यातील प्रतिबंधित गुटखा व तंबाखूच्या चोरट्या व्यापारामागील संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी आर्थिक व्यवहार, वाहतूक व्यवस्था आणि पुरवठा साखळीचा तपास सुरू करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे करीत असून अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.
