बारामती उपविभागात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाला प्रारंभ.

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामती उपविभागात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाला प्रारंभ.

⭕महसूल सेवा तळागाळापर्यंत जलद व पारदर्शक पद्धतीने पोहोचवण्यावर भर

बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसूल विषयक समस्या तातडीने सोडवून शासनाच्या सेवा अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी बारामती उपविभागात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न तातडीने निकाली काढण्यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक अधिकाऱ्याने आपली जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडत नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा करावा, असेही आवाहन त्यांनी केले.

🟢मार्च ते मे दरम्यान शिबिरांचे आयोजन

‘महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचा पहिला टप्पा मार्च ते मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत मंडळ स्तरावर विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करून नागरिकांच्या प्रलंबित महसूल प्रकरणांचे तातडीने निराकरण केले जाणार आहे.

या अभियानासंदर्भात २७ फेब्रुवारी रोजी बारामती येथील कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली होती.

🟡विविध सेवांचा तत्काळ लाभ

या शिबिरांमध्ये महसूल विभागाशी संबंधित अनेक सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये –

1. फेरफार प्रकरणे

2. भूमी अभिलेख दुरुस्ती

3. उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्रे

4. अकृषक परवानगी

5. गाव दप्तर अद्ययावत करणे

यांसारख्या सेवांचा समावेश असून नागरिकांच्या तक्रारी व अर्जांचे तातडीने निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. कोणताही नागरिक प्रलंबित प्रकरणामुळे त्रस्त राहू नये, यासाठी कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी बारामती उपविभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होऊन महसूल सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

🟤बारामती तालुक्यातील शिबिरांचे वेळापत्रक

बारामती तालुक्यातील शिबिरांची सुरुवात ७ मार्च रोजी काटेवाडी येथून होणार आहे. त्यानंतर –

१४ मार्च – शिर्सुफळ

२० मार्च – करंजेपुल

२७ मार्च – पणदरे

३ एप्रिल – वडगाव निंबाळकर

१० एप्रिल – मोरगाव

१७ एप्रिल – लोणी भापकर

२४ एप्रिल – सुपा

८ मे – बारामती

१५ मे – माळेगाव बु.

२२ मे – उंडवडी क.प.

🟣इंदापूर तालुक्यातील शिबिरांचे वेळापत्रक

इंदापूर तालुक्यात ७ मार्च रोजी इंदापूर व काटी येथे शिबिरांचे आयोजन होणार आहे. त्यानंतर –

१४ मार्च – माळवाडी व लाखेवाडी

१० एप्रिल – लोणी देवकर व भिगवण

१७ एप्रिल – पळसदेव व सणसर

८ मे – अंथुर्णे व निमगाव केतकी

१५ मे – लासुर्णे व बावडा

या शिबिरांच्या माध्यमातून महसूल सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध करून देत नागरिकांच्या अडचणींचे जलद निराकरण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!