करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- अहोरात्र मेहनत करून नागरिकांचे जीवन प्रकाशमान ठेवणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत, वायरमन दिनाचे औचित्य साधून शिवजयंती उत्सव समिती, करमाळा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वायरमन, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सदरचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पार पडला.
कार्यक्रमाच्या वेळी बोलताना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ऊन, वारा, पाऊस असो वा रात्रीचा प्रसंग, वायरमन आणि वीज कर्मचारी जिवाची पर्वा न करता आपली सेवा बजावत असतात. अनेकदा आपण विजेच्या सोयींचा आनंद घेतो, पण त्यामागे या कर्मचाऱ्यांचे मोठे कष्ट असतात. त्यांच्या याच योगदानाचा सन्मान करण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सत्कारला उत्तर देताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी समितीचे आभार मानले. “कामाच्या व्यापात अनेकदा धावपळ होते, पण जेव्हा समाजाकडून अशा प्रकारे कामाची पोचपावती मिळते, तेव्हा काम करण्याचा उत्साह द्विगुणित होतो,” अशा भावना सत्कारमूर्तींनी व्यक्त केल्या.
या सोहळ्याला शिवजयंती उत्सव समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सदस्य तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि करमाळ्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.