करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयातून मिळणाऱ्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रांबाबत सध्या सावळागोंधळ सुरू असून, याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शासनाने सर्वत्र डिजिटल इंडियाचा नारा दिला असला, तरी करमाळ्यात मात्र डिजिटल स्वाक्षरी आणि QR कोड / बार कोड नसलेली जुनाट पद्धतीची प्रमाणपत्रे दिली जात असल्याने ही प्रमाणपत्रे केवळ कागदाचा तुकडा ठरत आहेत.

विवाह झाल्यानंतर महिलेच्या नावामध्ये बदल करणे ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असते. आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र आणि पॅन कार्ड यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय कागदपत्रांवर माहेरच्या नावाऐवजी सासरचे नाव लावण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे. मात्र, करमाळा उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर डिजिटल स्वाक्षरी आणि अधिकृत QR कोड / बार कोड नसल्याने, ऑनलाइन पडताळणीवेळी ही प्रमाणपत्रे नाकारली जात आहेत.
अनेक नागरिक नाव बदलण्याच्या कामासाठी आधार सेंटरचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, क्युआर कोड / बार कोड नसल्यामुळे त्यांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव फेटाळले जात आहेत. लग्न होऊन महिने, वर्षे उलटले तरी साध्या एका प्रमाणपत्राअभावी आमची महत्त्वाची कामे रखडली आहेत. डिजिटल युगात आम्हाला हाताने लिहिलेली किंवा विना क्यूआर कोडची प्रमाणपत्रे देऊन प्रशासनाने आमची थट्टा मांडली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया एका त्रस्त महिलेने व्यक्त केली आहे.
उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने या तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर करून डिजिटल स्वाक्षरीत आणि QR कोडसह / बार कोड सह ऑनलाइन प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे. जोपर्यंत ही सोय होत नाही, तोपर्यंत महिलांना आपल्या हक्काच्या ओळखीच्या पुराव्यासाठी आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
आता या विषयावर प्रशासकीय स्तरावर काय हालचाली होतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
