करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी प्रभाग क्रमांक ७ मधील प्रलंबित समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्या त्वरित सोडवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. अस्वच्छता आणि पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी काल घेतलेल्या भेटीची दखल घेत त्यांनी हा तातडीचा निर्णय घेतला.
काल प्रभाग क्रमांक ७ मधील त्रस्त नागरिकांनी नगरपालिकेत जाऊन नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांची भेट घेतली होती. परिसरातील वाढलेली अस्वच्छता, साचलेले सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्याची अनियमितता यांबाबत नागरिकांनी लेखी निवेदन देऊन आपले गाऱ्हाणे मांडले होते. निवेदनाचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्षांनी आज स्वतः प्रभागाचा दौरा केला.
पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्याचे दिसून आले. यावर नगराध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सोबत असलेल्या स्वच्छता विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना संपूर्ण परिसराची स्वच्छता तातडीने करण्याचे आदेश दिले. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल अशी परिस्थिती खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांना सुनावले.
यावेळी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने मांडला. जुन्या पाईपलाईनमुळे होणारा कमी दाबाचा पाणीपुरवठा आणि गळती यावर उपाय म्हणून, या भागात नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले. या कामाचे नियोजन करून लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत.
नगराध्यक्षांच्या या तत्परतेमुळे प्रभाग ७ मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, रखडलेली कामे आता मार्गी लागतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.