मराठा समाजासाठी डिजिटल सेवांचा नवा टप्पा; ११,६७० कोटींचे आर्थिक सहाय्य वितरित
पुणे/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध व्याज परतावा योजना प्रभावीपणे राबविल्या जात असून, आतापर्यंत तब्बल ११,६७० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले आहे. या योजनांमुळे राज्यातील १ लाख ७० हजारांहून अधिक लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातही या योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, १२ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना सुमारे ९७ कोटी २३ लाख रुपयांचे सहाय्य देण्यात आले आहे.
महामंडळाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत लाभार्थ्यांसाठी नागरिकाभिमुख आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
स्मार्ट बॉटद्वारे तत्काळ मार्गदर्शन
लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘स्मार्ट बॉट’ सुरू करण्यात आला आहे. या सुविधेमुळे योजना, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया तसेच व्यवसाय निवडीबाबत २४x७ मार्गदर्शन मिळत आहे. आतापर्यंत १५,५०० हून अधिक लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
🔶WhatsApp सेवा: माहिती थेट मोबाईलवर
महामंडळाने WhatsAppच्या माध्यमातून अर्जाची स्थिती, मंजुरी, LOI, क्लेम प्रक्रिया आणि व्याज परताव्याची माहिती थेट लाभार्थ्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू केली आहे. ८९७६८५५९२१ या अधिकृत क्रमांकावरून मिळालेल्या संदेशाला २४ तासांत प्रतिसाद दिल्यास अद्ययावत माहिती मिळते.
🟣WhatsApp Channel द्वारे ताज्या अपडेट्स
नवीन परिपत्रके, शासन निर्णय आणि विविध उपक्रमांची माहिती WhatsApp Channelच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे.
🟡नवी मुंबईत अत्याधुनिक मुख्यालय उभारणी
महामंडळाच्या वाढत्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर पनवेल, नवी मुंबई येथे सिडकोमार्फत सुमारे १.५ एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज बहुउद्देशीय मुख्यालय उभारण्यात येणार आहे. यात प्रशासकीय कार्यालय, प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र, निवासी सुविधा, संशोधन केंद्र आणि डिजिटल सेवा केंद्रांचा समावेश असेल.
या सर्व उपक्रमांमुळे डिजिटल सक्षमीकरणास चालना मिळून लाभार्थी-केंद्रित सेवा अधिक गतिमान व सुलभ होणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक प्राजक्ता ओंकार येरुणकर यांनी दिली आहे.