अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज व्याज परतावा योजना अधिक सुलभ; ऑनलाईन सुविधांमुळे लाभार्थ्यांना दिलासा
मुंबई/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून, प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि लाभार्थी-केंद्रित करण्यात आली आहे. सुधारित ऑनलाईन प्रणालीमुळे लाभार्थ्यांना अनेक प्रक्रिया स्वतःच्या लॉगिनद्वारे पूर्ण करता येणार असून, यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक मंजुरी स्तरावर “अपूर्ण कागदपत्रे” या कारणामुळे प्रलंबित असलेली प्रकरणे आता लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर पाहता येणार आहेत. या प्रकरणांमधील आवश्यक कागदपत्रे लाभार्थी स्वतः ऑनलाईन अपलोड करून पूर्तता करू शकतात. कागदपत्रे अद्ययावत केल्यानंतर प्रकरण ‘स्क्रुटिनी’ स्तरावर जाईल आणि पडताळणीनंतर पात्र प्रकरणे पुढील प्रक्रियेसाठी मुख्यालयाकडे पाठविली जातील.
व्याज परतावा क्लेम प्रक्रियेतही सुधारणा करण्यात आली असून, “होल्ड” स्थितीतील प्रकरणे आता कारणांसह लॉगिनवर दिसणार आहेत. लाभार्थ्यांनी १५ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे जिल्हा समन्वयकांमार्फत सादर करून प्रकरण नियमित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात ही कागदपत्रे थेट लॉगिनद्वारे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
तसेच, त्रुटी नसलेल्या प्रकरणांसाठी “सेंट फॉर सीएएफओ” स्तरावर पोहोचताच पुढील क्लेम सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे प्रक्रिया अधिक गतिमान होणार असून लाभार्थ्यांचा वेळ वाचणार आहे.
दरम्यान, काही प्रकरणांमध्ये समान मोबाईल क्रमांक, बँक तपशीलातील विसंगती किंवा कागदपत्रांतील त्रुटींमुळे ती “ब्लॉक” करण्यात आली आहेत. नाशिक व अहिल्यानगर येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या गैरव्यवहारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आली असून संबंधित प्रकरणांमध्ये फौजदारी कारवाई सुरू आहे. अशा लाभार्थ्यांनी मूळ कागदपत्रांसह दुरुस्ती करून अर्ज जिल्हा समन्वयकांकडे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळाने सर्व लाभार्थ्यांना आपल्या लॉगिनवर जाऊन प्रकरणांची स्थिती तपासून आवश्यक ती पूर्तता करण्याचे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
याशिवाय, लघुउद्योजकांना चालना देण्यासाठी “बिझनेस प्रमोशन (मार्केटिंग टॅब)” ही डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या धर्तीवर विकसित करण्यात आलेल्या या सुविधेमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, फोटो, किंमत व संपर्क तपशील अपलोड करता येतात. सध्या या प्लॅटफॉर्मवर २७,५०० हून अधिक व्यवसायांची नोंद झाली असून “लोकल टू ग्लोबल” संकल्पना प्रभावीपणे राबवली जात आहे.
तसेच, वेबीनार, युट्यूब व पॉडकास्टद्वारे व्यवसाय व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग आणि आर्थिक नियोजन यासारख्या विषयांवर प्रशिक्षण दिले जात आहे. डिजीलॉकर इंटीग्रेशनमुळे कागदपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि विश्वासार्ह झाली असल्याची माहिती जिल्हा समन्वयक जयश्री पाटील यांनी दिली आहे.