अमळनेर अग्निशमन विभागात बनावट भरतीचा भडका? प्रमाणपत्रांवरून संशय अग्निशमन विभाग अडचणीत..
अमळनेर : विक्की जाधव.
अग्निशमन विभागातील कथित आर्थिक गैरव्यवहार व बेकायदेशीर पदभरतीबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनुसार शासनाची दिशाभूल करून आर्थिक लूट केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी 11 जून 2025 रोजी संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावत मूळ शैक्षणिक व प्रशिक्षण प्रमाणपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी मूळ कागदपत्रांऐवजी झेरॉक्स प्रती सादर केल्याने संशय अधिक गडद झाला आहे. सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत फायर ट्रेनिंग सेंटरचे प्रमाणपत्र किंवा शासकीय प्रशिक्षणाची पात्रता नसल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांना बगल देत भरती प्रक्रिया राबवली गेली का? असा सवाल उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई करून संबंधितांवर निलंबनाची कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदार परेश उदेवाल यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची वारंवार भेट घेऊन कारवाईचा आग्रह धरला आहे. मात्र, अद्याप ठोस निर्णय न झाल्याने प्रशासन कुणाच्या दबावाखाली आहे का? अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडेही लेखी तक्रार देण्यात आली असून, स्थानिक पातळीवर कारवाई न झाल्यास मुंबई येथील मुख्य संचालनालय (DMA ऑफिस) व नगरविकास शाखेकडे दाद मागून संबंधित कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.