करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा तालुक्यातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी कामांसाठी आता तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारण्याची गरज उरणार नाही. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या नेतृत्वाखाली ७ मार्चपासून १५ मे पर्यंत करमाळा तालुक्यातील ११ महसूल मंडळांमध्ये महाराजस्व अभियान राबवण्यात येणार आहे.
हे केवळ एक सरकारी शिबीर नसून, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचा एकत्रित प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, सर्व विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहणार असल्याने नागरिकांची अनेक प्रलंबित कामे ऑन द स्पॉट मार्गी लागणार आहेत.
या शिबिरात पुढील कामे करून घेता येणार आहेत त्यामध्ये सातबारा दुरुस्ती अंतर्गत वारस नोंदी, पोटखराबा क्षेत्र आणि तुकडेबंदी संदर्भातील तांत्रिक अडचणी सोडवणे. रेशन कार्ड अंतर्गत नावे कमी करणे किंवा नवीन नावे समाविष्ट करणे.
शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे आणि नैसर्गिक आपत्तीच्या प्रलंबित मदतीसाठी पाठपुरावा करणे. तसेच फार्मर आय डी काढून देणे त्याचप्रमाणे लक्ष्मी मुक्ती योजनेद्वारे सातबारावर महिलांचे नाव लावणे आदी कामे केली जाणार आहेत.
सदर अभियानाच्या जनजागृतीसाठी तहसीलदार ठोकडे यांनी प्रत्येक गावाचा व्हॉट्सॲप ग्रुप सक्रिय केला आहे तसेच विशेष म्हणजे, रमजानच्या काळात मशिदींमधील लाऊडस्पीकरवरूनही या अभियानाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची विनंती मौलवींना करण्यात येणार आहे, जेणेकरून कोणाचाही रोजगार न बुडता त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. यावरून तहसीलदार यांनी हे अभियान गावपातळीवर माहिती पोहोचवण्याचे नियोजन केले आहे. नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
शासकीय यंत्रणा तुमच्या दारी येत आहे. ७ मार्च ते १५ मे या कालावधीत आपापल्या मंडळातील शिबिराच्या तारखा जाणून घेऊन नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करून घ्यावा.
– शिल्पा ठोकडे, तहसीलदार, करमाळा