करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) : ऐतिहासिक वैभव लाभलेला करमाळ्याचा भुईकोट किल्ला आज अस्तित्वाच्या लढाईत शेवटच्या घटका मोजत आहे. करमाळा दुर्गसंवर्धन समितीच्या पाठपुराव्यानंतर आणि तत्कालीन लोकप्रतिनिधी संजय शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे पुरातत्व विभागाने २४ टप्प्यात निधी मंजूर केला होता. मात्र, पहिल्या टप्प्यातील कामाचा श्रीगणेशा झाल्यानंतर आता हे काम बंद पडले असल्याने दुर्ग प्रेमी मधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे
पुरातत्व खात्याने सुरुवातीला किल्ला विभागातील वेशीच्या बाजूने ढासळलेल्या कमानीची दुरुस्ती उत्तमरित्या केली आहे, पण त्यानंतरच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे कारण जिथे तटबंदीची गरज नव्हती (म्हणजेच खंदक रोड च्या बाजूला) तिथे अर्धवट बांधकाम करण्यात आले आहे. तसेच जिथे जास्त गरज होती ते म्हणजे किल्ला वेस ते नगर परिषद रस्ता कारण याबाजूची तटबंदी पूर्णपणे ढासळली आहे ती दुरुस्त करणे आवश्यक होते.
तसेच, पूर्व बाजूची मुख्य वेस, जी आजही सुस्थितीत आहे. परंतु सुस्थितीत असलेल्या दगडी चिरांमध्ये चुना भरणे आवश्यक होते, मात्र तिथे आता पिंपळ आणि कडुलिंबाची मोठी झाडे उगवू लागली आहेत. या झाडांच्या मुळांमुळे दगडी सांधे सैल होऊन ही ऐतिहासिक कमान भविष्यात धोकादायक ठरू शकते, अशी भीती दुर्गप्रेमी यांच्याकडून व्यक्त होत आहे.
उर्वरित निधी अभावी सध्या कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. या कामाला आता विद्यमान आमदार आणि खासदार शासन स्तरावर किती गती देतात, यावरच किल्ल्याचे भविष्य अवलंबून आहे.
या गंभीर परिस्थितीवर प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक रवी जाधव यांनी आपली भूमिका मांडताना प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले की,
“करमाळ्याचा किल्ला हे केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून तो आमच्या शहराचा स्वाभिमान आहे. दुर्दैवाने, पुरातत्व विभागाचे अधिकारी ज्या ठिकाणी खरोखर गरज आहे, तिथे काम न करता केवळ निधी खर्च करण्यासाठी अनावश्यक ठिकाणी काम करत असल्याचे दिसत आहे. वेशीच्या कमानीत उगवलेली झाडे भविष्यात मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकतात. जर तातडीने उर्वरित निधी उपलब्ध करून काम सुरू झाले नाही, तर हा ऐतिहासिक वारसा कायमचा नामशेष होईल. नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत यांच्या नेतृत्वाखालील आम्ही सर्वजण शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहोत.” – रवी जाधव, नगरसेवक करमाळा नगर परिषद
