शालेय बस विशेष तपासणी मोहिमेत १५ वाहनांवर कारवाई; ६७,५०० रुपयांचा दंड वसूल

अपनी भाषा में पढ़े! Translate

शालेय बस विशेष तपासणी मोहिमेत १५ वाहनांवर कारवाई; ६७,५०० रुपयांचा दंड वसूल

बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती यांच्या वतीने बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यांत शालेय बस विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ७७ शालेय बसांची तपासणी करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनांकडून एकूण ६७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

या विशेष मोहिमेत बसच्या योग्यता प्रमाणपत्राची वैधता, विमा प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी), वाहन परवाना, तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. काही बसांकडे मुदत संपलेली कागदपत्रे आढळून आली, तर काही ठिकाणी रस्ते सुरक्षा नियमांचे अपूर्ण पालन, आपत्कालीन बाहेर पडण्याचे दरवाजे, अग्निशामक यंत्रणा, फर्स्ट एड बॉक्स यांसारख्या सुरक्षाविषयक बाबींमध्ये त्रुटी आढळल्या. अशा दोषी वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मोटार वाहन निरीक्षकांनी संबंधित शाळांना भेटी देत शालेय बस नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. विधिग्राह्य नसलेली अथवा मुदत संपलेली कागदपत्रे तात्काळ नूतनीकरण करण्याबाबत शाळा व्यवस्थापनांना बजावण्यात आले. तसेच बसचालक व परिचालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत वाहतूक नियमांचे पालन करावे, वेगमर्यादा पाळावी आणि बसमध्ये आवश्यक सुरक्षा साधनसामग्री उपलब्ध ठेवावी, असे निर्देश देण्यात आले.

विद्यार्थ्यांचे पालक व नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारी आणि मागण्यांचा विचार करून ही मोहीम राबविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतरही ही विशेष तपासणी मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सर्व शालेय बस चालक, मालक व इतर वाहनधारकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे अद्ययावत ठेवून नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!