चिमनपुरी पिंपळेतील ७० लाखांची संरक्षित भिंत म्हणजे जनतेच्या पैशांचा खेळखंडोबा?
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील मौजे पिंपळे (चिमणपुरी) येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उभारली जात असलेली तब्बल ७० लाख रुपयांची संरक्षित भिंत सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सामाजिक कार्यकर्ते अनंत रमेश निकम यांनी या कामावर थेट भ्रष्टाचार आणि निष्कृष्ट दर्जाचा गंभीर आरोप करत प्रशासनाला जागे केले आहे.

जनतेच्या पैशातून उभा राहणारा हा प्रकल्पच जनतेसाठी धोकादायक ठरणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मंजूर इस्टिमेट आणि तांत्रिक मान्यतेला हरताळ फासून मनमानी पद्धतीने ठेकेदार काम करत असून भिंतीची आवश्यक रुंदी आणि मजबुती जाणीवपूर्वक कमी ठेवली तर सिमेंट, काँक्रिट, मुरूम, दगड आणि लोखंडी साहित्य निकृष्ट प्रतीचे वापरले जात असून माती ढासळलेली असतानाही कोणतेही सक्षम मजबुतीकरण न करता काम लवकर उरकले जात आहे. पुढे पावसाळ्याचे दिवस असून सहाजिकच येथे पाणी भरेल. ही भिंत भविष्यात कोसळून जीवितहानी झाली तर जबाबदार कोण?
सर्वात महत्वाची धक्कादायक बाब म्हणजे कामाची कोणतीही अधिकृत गुणवत्ता चाचणी न करताच संबंधित ठेकेदार व अधिकारी संगनमताने बिले काढण्याच्या तयारीत आहेत. असे असलेल तरी अमळनेर तालुक्यात याच ठेकेदाराच्या इतर कामांवरही तफावत आढळल्याच्या चर्चा रंगल्या असून प्रशासनाचे मौन अधिकच संशय वाढवत आहे. जनतेच्या पैशांवर डल्ला मारण्याचा हा उघड प्रकार असल्याची टीका गावभर होत आहे.
या पार्श्वभूमीवर स्वतंत्र तज्ञ अभियंत्यामार्फत तातडीने तांत्रिक चौकशी करून संपूर्ण कामाची गुणवत्ता तपासावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि काम मानकांनुसार पुन्हा करून घ्यावे, अशी मागणी होत आहे.l. आता प्रशासन जागे होणार की पुन्हा एकदा जनतेच्या पैशांवर पडदा टाकला जाणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पुढील वृत्त लवकरच.