करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- गेल्या तीन ते चार दिवसांपासून करमाळा शहरात पसरलेल्या उग्र आणि रासायनिक दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या गंभीर विषयावर मार्मिक समाचार ने सर्वात आधी बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत महसूल आणि नगरपरिषद प्रशासनाने शोधमोहीम राबवली आणि या दुर्गंधीचे मुख्य उगमस्थान शोधून काढले आहे. प्रशासनाच्या या धाडसी कारवाईमुळे आज शहराच्या हवेचा दर्जा पूर्ववत झाला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
तहसीलदार शिल्पा ठोकडे व मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत स्वतः माहिती घेतली. तपासादरम्यान असे निदर्शनास आले की, करमाळा येथील दत्त मंदिर परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या भांडार विभागात काही औषधे कालबाह्य (Expired) झाली होती. दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी ही औषधे शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्याऐवजी तिथेच खड्डा खणून जाळण्याचा प्रयत्न केला.
या औषधांसोबतच प्लॅस्टिकच्या बाटल्या, रबर, इंजेक्शन्स आणि विविध कागदपत्रे जाळण्यात आली होती. ही सामग्री पूर्णपणे न जळल्यामुळे त्यातून रासायनिक धूर बाहेर पडला. हाच धूर संपूर्ण शहरात पसरल्याने पहाटेच्या वेळी नागरिकांना डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास आणि डोकेदुखी अशा समस्या जाणवू लागल्या होत्या.
‘मार्मिक समाचार’ने जनतेचा आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन हा प्रकार थांबवला आणि संबंधितांना सूचना दिल्या. आज सकाळी शहरात फिरणाऱ्या नागरिकांनी हवेत दुर्गंधी नसल्याचे सांगितले. प्रशासनाच्या या गतिमान कामाचे कौतुक होत असून, तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि मुख्याधिकारी सचिन तपसे यांचे नागरिकांनी विशेष आभार मानले आहेत.
वरील सर्व घटनेची संपूर्ण माहिती काय सांगता चे पत्रकार अशोक मुरूमकर यांनी त्यांच्या यू तूट्यूब चॅनेलवर दाखवली आहे. त्यामुळे नागरिकांना सदर घटनेचा संपुर्ण घटनाक्रम समजला आहे.
“नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही बाबीची गय केली जाणार नाही. बातमीद्वारे समोर आलेल्या तक्रारीची तत्काळ शहानिशा करून आम्ही उगमस्थान शोधले असून, आता परिस्थिती नियंत्रणात आहे.”
— तहसील व नगरपरिषद प्रशासन, करमाळा