करमाळा (प्रतिनिधी): “विद्यार्थ्यांनी नेहमी मोठी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ती गाठण्यासाठी आत्मविश्वास, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. मेहनत कधीही वाया जात नाही आणि प्रामाणिक प्रयत्नांना नक्कीच यश मिळते,” असे प्रतिपादन कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय डॉ. श्री प्रवीणकुमार लोखंडे यांनी केले.
श्री धाकोजी महाराज माध्यमिक विद्यालय, निमगाव डाकू येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा रोप्य महोत्सवी वर्षाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी चिरंजीव यश श्रीपाद आडकर.
यशची अमेरिकेतील ‘स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क’च्या प्रतिष्ठेच्या ‘ऑनर्स कॉलेज’मध्ये निवड झाली असून, त्याला शिक्षणासाठी तब्बल ८० लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल डॉ. प्रवीणकुमार लोखंडे यांच्या हस्ते यशचा विशेष गौरव करण्यात आला.

विश्वकर्मा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व नगरसेवक श्री. प्रसादराव ढोकरीकर यांनी यशच्या शैक्षणिक व सामाजिक कामगिरीचे कौतुक करताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तसेच यश अडकर हा करमाळा येथील नवभारत इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका मेघा शेटे (आडकर) यांचा मुलगा आहे.
या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने गटविकास अधिकारी श्री. अजिंक्य सूर्यवंशी, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. कौस्तुभ डबीर. अनिल तोरडमल, विशाल मेहत्रे, विजू काका तोरडमल, नितीन देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष अनिल गदादे, माजी जि.प. सदस्य अशोक खेडकर, प्रवीण घुले, कैलास शेवाळे, अंबादास पिसाळ, प्रकाश काका शिंदे, उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे, नगरसेवक देवा खरात, सुनील शेलार, नानासाहेब शेळके, तसेच निमगाव डाकूचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य.
उपस्थित सर्व मान्यवरांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आगामी बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मोमीन सर यांनी केले. ‘वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी निमगाव डाकू परिसरातील ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
