करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा तालुक्यातील मुलांमध्ये साहसी खेळांचे बीज रोवणारे प्रशिक्षक नागनाथ बोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला ‘वीर शिवाजी महाराज कराटे’चा वारसा आता रशियापर्यंत पोहोचला आहे. बोळगे यांचा विद्यार्थी शिवतीर्थ हनुमंत निकत हा रशियामध्ये एमबीबीएस (MBBS) शिक्षण घेत असतानाच, तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तलवारबाजी, दांडपट्टा आणि लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर करून शिवकालीन युद्धकलेचा डंका वाजवणार आहे.
नागनाथ बोळगे यांनी अनेक वर्षांपूर्वी करमाळ्यासारख्या ग्रामीण भागात ‘वीर शिवाजी महाराज कराटे’च्या माध्यमातून मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. केवळ खेळ म्हणून नव्हे, तर स्वसंरक्षण आणि संस्कृती जोपासण्यासाठी त्यांनी दिलेले हे धडे आज वटवृक्षासारखे विस्तारले आहेत. त्यांच्या या अकॅडमीतून घडलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी आजवर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक सुवर्णपदके पटकावली आहेत.
बोळगे यांचा लाडका शिष्य शिवतीर्थ हनुमंत निकत हा सध्या रशियात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मात्र, शिक्षणासोबतच त्याने आपल्या मातीतील मर्दानी कलेची नाळ तुटू दिली नाही. परदेशात असूनही तो तिथल्या विद्यार्थ्यांना ही कला शिकवत आहे. यंदाच्या शिवजयंतीला रशियाच्या भूमीवर शिवतीर्थ जेव्हा तलवार आणि दांडपट्टा फिरवेल, तेव्हा करमाळ्याच्या मातीचा अभिमान सातासमुद्रापार दिसेल. आपल्या विद्यार्थ्याच्या या कामगिरीमुळे प्रशिक्षक नागनाथ बोळगे यांच्यासह संपूर्ण करमाळा तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही करमाळ्यात शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहणार आहे. नागनाथ बोळगे यांचे विद्यार्थी उद्या सकाळी ९:४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जमणार आहेत. यावेळी लाठी-काठी, दांडपट्टा आणि विविध मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून रयतेच्या राजाला मानवंदना देण्यात येणार आहे.
“माझा विद्यार्थी रशियात जाऊन आपल्या शिवकालीन कलेचे प्रदर्शन करतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे. करमाळ्यातील मातीतील हा वारसा जागतिक पातळीवर पोहोचला, हेच माझ्या प्रशिक्षणाचे यश आहे.”
— नागनाथ बोळगे (प्रशिक्षक, वीर शिवाजी कराटे)