जिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या कामकाजाचा आढावा; तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक व अनुसूचित जाती-जमातींसाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्याच्या सूचना
पुणे/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आणि समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, ऊसतोड कामगार ओळखपत्र वितरण, सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती तसेच तृतीयपंथीयांच्या तक्रार निवारण समितीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.
बैठकीत सहायक समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे यांनी तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती व जमातीतील नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने आणि प्रभावी निवारण व्हावे यासाठी पोलीस विभागाने सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ‘एक खिडकी योजना’ सुरू करावी, अशी सूचना केली. या योजनेसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून संबंधित प्रकरणे प्राधान्याने हाताळावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
🔹अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावा घेताना श्री. लोंढे यांनी पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रक्रियांचा काटेकोर अवलंब करावा, तसेच प्रलंबित प्रकरणे गतीने निकाली काढावीत, अशा सूचना पोलीस विभागाला दिल्या.
🟤ऊसतोड कामगारांच्या संदर्भात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी संबंधित ग्रामसेवकांशी समन्वय साधून सर्व कामगारांना ओळखपत्र उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश देण्यात आले. कामगारांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करणे, त्यांना नियमित अन्नधान्य उपलब्ध होईल याची दक्षता घेणे, तसेच कामगार
आणि मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी आवश्यक माहिती समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करण्यासाठी प्रतिनिधी नियुक्त करावा, असेही सांगण्यात आले. कारखान्यांतील वाहने ‘एम-परिवहन’ ॲपवर नोंदणीकृत असल्याची खात्री करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
🟣ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी स्वतंत्र ‘ज्येष्ठ नागरिक कक्ष’ स्थापन करण्याबाबत चर्चा झाली. महानगरपालिका व ग्रामीण भागातील विरंगुळा केंद्रांची माहिती समाज कल्याण विभागाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
🟡तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, केंद्र शासनाच्या तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा २०१९ व नियम २०२० अंतर्गत तृतीयपंथी समाजासाठी स्वतंत्र राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात आले असून राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक १४४२७ कार्यान्वित करण्यात आला आहे. या हेल्पलाइनद्वारे योजनांची माहिती, अर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन, अडचणींचे निराकरण तसेच तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. तृतीयपंथी नागरिकांनी या हेल्पलाइनचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले.
बैठकीस जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवढे, विविध विभागांचे अधिकारी, समिती सदस्य, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.