…अन् शेतकऱ्याचा पुत्र तालुका कृषी अधिकारी झाला.
ओंकार दिलीप गवळी याची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी
माढा/प्रतिनिधी:- अजिनाथ कनिचे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने १८ मे २०२५ मध्ये मुख्य परीक्षा व २३ जानेवारी २०२६ मध्ये घेतलेल्या मुलाखतीत राज्यात ५२ वी रँक मिळवत प्रचंड मेहनत,चिकाटी अभ्यासाच्या जोरावर तांदुळवाडी.ता.माढा येथील शेतकरी पुत्र ओंकार सुरेखा दिलीप गवळी याने राजपत्रित तालुका कृषी अधिकारी वर्ग-२ या पदाला गवसणी घातली आहे.विशेष बाब म्हणजे ज्या दिवशी निकाल जाहीर झाला त्या दिवशी ओंकार हा आपल्या आई-वडिलांना शेतीकामात मदत करत होता.शेतकऱ्याचा मुलगा तालुका कृषी अधिकारी झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ओंकारचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा,तांदुळवाडी व माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय,काटेगाव ता.बार्शी येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण मदर पब्लिक स्कूल,माढा येथे व बीएससी अग्रीकल्चरची पदवी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी येथून तर एमएससी इन अग्रो फाॅरेस्टीची डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,दापोली येथून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.त्याला वडील दिलीप गवळी व प्राध्यापक व्ही.एम.मस्के यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
ओंकार गावाकडे आल्यानंतर नेहमीच आई-वडिलांना शेतामध्ये काम करण्यासाठी मदत करायचा.१० तारखेला देखील आई-वडिलांना दिवसभर शेतातील कामे करण्यासाठी मदत करत असताना सायंकाळी ५:३०वा.सुमारास त्याने नेटवर निकाल पाहिला.आणि रँक पाहून त्याच ठिकाणी आई-वडिलांना घट्ट मिठी मारून आपल्या आनंद साजरा केला.
ओंकार गवळी याने एमपीएससीच्या ४ वर्षाच्या प्रवासात ६ मुख्य परिक्षा व २ मुलाखती नंतर हे यश संपादन केले.