अमळनेरात धक्कादायक प्रकार : बिल्डर सरजू गोकलानींसह सहा जणांवर गुन्हा.. पण वाचा गोकलांनी यांची प्रतिक्रिया
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील न्यू प्लॉट परिसरात 75 ते 80 वर्षांपासून राहत असलेल्या एका कुटुंबाचे घर जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहरातील नामांकित बिल्डर सरजू गोकलानी यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
न्यू प्लॉट भागातील देशमुख चाळ, टीपी क्रमांक 45/01 येथे शरद जाधवराव शिंदे यांचे दोन खोल्यांचे पत्र्याचे भाड्याचे घर असून त्या घराचा वीज व नळ कनेक्शन त्यांच्या नावावर आहे. शिंदे कुटुंब तब्बल सात-आठ दशकांपासून त्या ठिकाणी वास्तव्यास आहे. 10 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कोणतीही पूर्वसूचना किंवा संमती न घेता काही इसमांनी घरात प्रवेश करून जेसीबीद्वारे संपूर्ण घर जमीनदोस्त केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या तोडफोडीत घरातील लोखंडी गोदरेज कपाट, रॅक, स्टीलची शेगडी, कुलर, दोन पंखे आदी अंदाजे 20 हजार रुपयांचे साहित्य नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध भादवी कलम 329(3), 329(4), 324(4), 352, 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.
प्रतिक्रिया.
दरम्यान, या संदर्भात सरजू गोकलानी यांच्या सोबत मार्मिक ने संपर्क साधला असता सरजू गोकलानी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. संबंधित जमिनीच्या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नसून तोडफोड करणारी जेसीबी माझी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय द्वेषातून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून, “मी त्या रस्त्याचा गेल्या सहा महिन्यांपासून वापरही केलेला नाही. काही स्थानिक पत्रकारांचाही या प्रकरणात हस्तक्षेप आहे,” असा आरोप त्यांनी केला. आपण कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.