करमाळा प्रतिनिधी(सागर गायकवाड) :- शास्त्रीय नृत्य ही केवळ कला नसून ती एक साधना आहे. कलेच्या छंदामुळे माणूस कधीही नैराश्यात (डिप्रेशन) जात नाही, उलट त्याला आयुष्यातील अपयश पचवण्याची एक नवी ताकद मिळते, असे प्रतिपादन करमाळ्याचे गटविकास अधिकारी (BDO) मा. मनोज राऊत यांनी केले.
करमाळा येथील ‘नृत्यशैली भरतनाट्यम् नृत्यालय’ आयोजित ‘नृत्य संध्या’ आणि विद्यार्थिनी गुणगौरव सोहळा नुकताच केमिस्ट भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. मनोज राऊत, डॉ. अपर्णा भोसले आणि डॉ. सत्यपाल श्रीवास्तव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने करण्यात आली.
या दिमाखदार सोहळ्यात नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी जिजाऊ प्रशस्ती, आंगिकम्, नमस्कार, पुष्पांजली, लक्ष्मी स्तोत्र आणि गणेश वंदना अशा विविध रचनांमधून भरतनाट्यम्चा अविष्कार घडवत उपस्थितांची मने जिंकली. तीन वर्षांपूर्वी मितवा श्रीवास्तव-अग्रवाल यांनी मयूरीताई जोशी (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या या नृत्यालयाचे आज एका वटवृक्षात रूपांतर होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या प्रसंगी बोलताना डॉ. अपर्णा भोसले म्हणाल्या की, “भरतनाट्यम् सादर करणे ही एक अभिजात कला आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शास्त्रीय नृत्याची साधना आवश्यक आहे.”

नृत्यालयाच्या संचालिका मितवा श्रीवास्तव-अग्रवाल यांनी प्रास्ताविकात गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या, “नियम आणि बंधनात राहून नृत्य करणे सोपे नाही, मात्र कलेमुळे माणूस एका विशिष्ट उंचीवर पोहोचतो.”
यावेळी भरतनाट्यम्ची पहिली व दुसरी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे आणि सहभागी विद्यार्थ्यांना कौतुकपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच, सुज्ञ पालकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पालकांच्या वतीने बोलताना मा. वालचंद माने यांनी मितवा ताईंच्या मेहनतीचे कौतुक केले. करमाळ्यासारख्या ठिकाणी विद्यार्थिनींना इतका मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मा. जयश्री वीर आणि मा. अनुराधा शिगची यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन मा. रेणुका दळवी यांनी केले, तर आभार गझलकार मितवा अग्रवाल यांनी मानले. राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली. या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर, महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
