अजित पवार यांच्या निधनानंतर पहिलीच मंत्रिमंडळ बैठक; कटफळ क्रीडा संकुलासह महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

अजित पवार यांच्या निधनानंतर पहिलीच मंत्रिमंडळ बैठक; कटफळ क्रीडा संकुलासह महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी

अजितदादांच्या स्वप्नांना मूर्त स्वरूप; ७५ कोटी १३ लाख रुपयांच्या क्रीडा संकुलाच्या अंदाजपत्रकावर शिक्कामोर्तब

बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज पार पडलेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी सुचवलेल्या व मार्गी लावलेल्या विविध विकासात्मक निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामध्ये अजित पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बारामती तालुक्यातील कटफळ येथे प्रस्तावित भव्य क्रीडा संकुलाच्या ७५ कोटी १३ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अजितदादांच्या निधनानंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा ओघ अखंड सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बारामती एमआयडीसीलगत कटफळ रेल्वे स्थानकाजवळ सुमारे २५ एकर क्षेत्रात अद्ययावत व आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याचे स्वप्न अजित पवार यांनी पाहिले होते. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणे, ग्रामीण व शहरी भागातील युवकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि राज्याला सक्षम खेळाडू घडविण्याचे केंद्र निर्माण करणे, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश होता. या प्रकल्पासाठी अजितदादांनी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळवून दिली होती.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या क्रीडा संकुलाच्या ७५ कोटी १३ लाख रुपयांच्या सविस्तर अंदाजपत्रकाला अंतिम मान्यता देण्यात आली. त्यामुळे या बहुप्रतीक्षित प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला आता गती मिळणार आहे. या क्रीडा संकुलात विविध मैदाने, इनडोअर क्रीडा सुविधा, प्रशिक्षण केंद्रे, खेळाडूंसाठी निवास व्यवस्था तसेच आधुनिक सोयीसुविधांचा समावेश असणार आहे.

आज सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहून दिवंगत अजित पवार यांनी घेतलेल्या व प्रस्तावित केलेल्या विविध निर्णयांवर शिक्कामोर्तब केले. या बैठकीत राज्याच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली असून, अजितदादांच्या विचारधारेनुसार विकासकामांना प्राधान्य देण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीत अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या संकल्पना व प्रकल्प पुढे नेण्याचा सरकारचा ठाम निर्धार व्यक्त केला. कटफळ क्रीडा संकुलासारखे प्रकल्प पूर्णत्वास नेणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या निर्णयामुळे बारामतीसह परिसरातील युवक, खेळाडू आणि क्रीडा संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हा प्रकल्प बारामतीच्या विकासाला नवी ओळख देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!