चोपडा तालुका रोटरी क्लबतर्फे जेष्ठ पत्रकार सुभाष पाटील यांनां जीवनगौरव पुरस्कार
अमळनेर : विक्की जाधव.
गेली ५५ वर्षे साहित्य व पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून समाजप्रबोधन करणारे ज्येष्ठ साहित्यिक सुभाष मो. पाटील यांना रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे यंदाचा ‘रोटरी गौरव पुरस्कार – साहित्य क्षेत्र’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. खान्देश प्रेस मागे, बी.एड. कॉलेज समोरील प्रांगणात आयोजित भव्य रोटरी उत्सवात हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा तहसीलदार थोरात साहेब उपस्थित होते, तर नगराध्यक्ष नम्रता पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रोटरी क्लबचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात तब्बल ५५ वर्षे उल्लेखनीय कार्य करत समाजमन घडविणाऱ्या सुभाष पाटील यांच्या योगदानाचा गौरव करताना मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला.सुभाष पाटील यांचा हा जीवनगौरव पुरस्कार केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान नसून संपूर्ण चोपडा तालुका व जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या साहित्यसेवेबद्दल आणि पत्रकारितेतील प्रामाणिक वाटचालीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.