वार्षिक स्नेहसंमेलन की पैशांची उकळपट्टी? PBA इंग्लिश मिडीयम स्कूलवर पालकांचा संतापाचा संताप
अमळनेर : विक्की जाधव.
PBA इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या नावाखाली प्रति विद्यार्थी ₹350 प्रमाणे तब्बल 1500 विद्यार्थ्यांकडून रक्कम वसूल करण्यात आल्याने संतप्त पालकांनी थेट “ही लूटच आहे” असा आरोप केला आहे. या हिशोबाने सुमारे ₹5,25,000 इतकी रक्कम जमा झाली, मात्र कार्यक्रमातील अव्यवस्था पाहता हा पैसा गेला कुठे? असा जळजळीत सवाल उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या घामाच्या पैशावर शोभेची लाइटिंग आणि दिखावा, असा आरोप पालकांनी केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमात बसण्याची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छतागृहांची सोय नाही अशा प्रकारे पालक व विद्यार्थ्यांचे अक्षरशः हाल झाले. महिला पालकांना बाहेर जावे लागले, लहान मुलांना 4-5 तास तहानलेले बसवून ठेवण्यात आले. काही विद्यार्थ्यांना दुपारी 4 वाजता बोलावून रात्री 11 वाजेपर्यंत थांबवण्यात आले, तरी त्यांची योग्य काळजी घेतली गेली नाही. “विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शाळेची नाही का?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, मागील वर्षीही अशाच प्रकारची गैरसोय झाल्यानंतर कार्यक्रमाचे ठिकाण बदलण्याचे आश्वासन देण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात स्नेहसंमेलन घेण्याचे जाहीर करण्यात आले होते, मात्र ते केवळ कागदावरच राहिले. पालक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शाळेने दिलेले कमिटमेंट पाळले नाही. दरवर्षी पैसे घेतले जातात, पण सुविधा शून्य!”

दरम्यान, शाळेच्या चेअरमन यांनी “माझी नुकतीच नियुक्ती झाली असून मला काही माहिती नाही” असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. पण पालकांचा प्रश्न सरळ आहे ₹5 लाखांहून अधिक रक्कम जमा झाली, तर त्याचा तपशील काय? फोटोग्राफी, स्टेज, लाइटिंग धरून खर्च एक लाखाच्या आसपास असेल, तर उर्वरित लाखो रुपये कुठे गेले? हिशोब द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा पालकांनी दिला आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून आर्थिक हिशोब सार्वजनिक करावा, अशी मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या नावावर पैसा उकळून त्यांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यवस्थापनाविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी संतप्त भावना पालकांमध्ये उसळली आहे. आता प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण अमळनेरचे लक्ष लागले आहे.