लाडकी बहीण योजनेसाठी मोठा दिलासा; e-KYC मुदतवाढीने महिलांमध्ये आनंद
अमळनेर : विक्की जाधव.
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर झाला असून e-KYC करण्याची अंतिम मुदत आता 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे तांत्रिक अडचणी, चुकीची नोंद किंवा पर्याय निवडल्यामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या हजारो महिलांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. विशेषतः ग्रामीण व निमशहरी भागातील महिलांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे.

योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रियेदरम्यान कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असल्याबाबत चुकून चुकीची माहिती भरल्याने त्या अपात्र ठरत होत्या. या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने शासन निर्णय जारी करत ऑनलाईन पोर्टलवर एकदाच सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, ही संधी फक्त पात्र महिलांसाठी असून सुधारणा केल्यानंतर पुन्हा बदल करता येणार नाही.दरम्यान, लाभार्थी महिलांनी अधिकृत पोर्टलवर Aadhaar Authentication द्वारे e-KYC प्रक्रिया वेळेत आणि काळजीपूर्वक पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक स्थैर्य देणारी महत्त्वाची योजना असून या मुदतवाढीच्या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाच्या या संवेदनशील निर्णयामुळे महिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशेचे हास्य उमटले आहे.