परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात जमाव, मोबाईल व झेरॉक्स केंद्रांवर मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

अपनी भाषा में पढ़े! Translate

परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात जमाव, मोबाईल व झेरॉक्स केंद्रांवर मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी (एसएससी) आणि इयत्ता १२ वी (एचएससी) बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण जिल्ह्यात कडक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी परीक्षा केंद्रांच्या परिसरात मनाई आदेश जारी केले आहेत.

हे आदेश १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते १८ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत लागू राहणार असून, पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्रांवर ते अंमलात असतील.

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, प्रत्येक परीक्षा केंद्राच्या तसेच त्याच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यासही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, परीक्षेस बसलेले परीक्षार्थी, परीक्षा संचालनासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

याशिवाय परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात असलेले सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी-आयएसडी बूथ, फॅक्स केंद्रे, झेरॉक्स सेंटर्स, ई-मेल व इंटरनेट सुविधा परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रॉन्झिस्टर, रेडिओ, कॅलक्युलेटर, लॅपटॉप यांसारखी कोणतीही इलेक्ट्रॉनिक किंवा संपर्क साधने परीक्षा केंद्रावर जवळ बाळगण्यास किंवा परिसरात वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षा शांततेत व पारदर्शकपणे पार पडाव्यात, हा आदेश अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, पालक व नागरिकांनी या काळात प्रशासनास सहकार्य करावे, परीक्षा केंद्रांच्या परिसरात अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!