“शिरपूर परीट महिला भगिनी मंडळाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न”
“तिळात गूळ मिसळा अन् जिभेवर गोडवा येऊ द्या” – सीमाताई रंधे
शिरपूर येथील शिरपूर परीट महिला भगिनी मंडळाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आशाताई रंधे उपस्थित होत्या. तसेच सीमाताई रंधे, स्वाती विहिरे,दिपाली सूर्यवंशी, हर्षाली रंधे, सायंकाताई वाघ व निर्मलाताई बोरसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा, राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना आशाताई रंधे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर महिलांनी सादर केलेली समूहगीत, नृत्य व सामाजिक संदेश देणारी सादरीकरणे यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. उपस्थित महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुरेखाताई बेडिसकर यांनी “ये मेरे वतन के लोगो” हे गीत सादर करून उपस्थितांना देशभक्तीच्या भावनेने भारावून टाकले.
स्वातीताई विहिरे यांनी आपल्या मनोगतात खूप सुंदर स्त्री स्वातंत्र्याचे आणि आताच्या बदलत्या स्त्री रूपाचे आणि आपण त्यामध्ये कशा पद्धतीने त्याचा स्वीकार केला पाहिजे याचे सुंदर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात सीमाताई रंधे यांनी अत्यंत भावस्पर्शी व प्रेरणादायी भाषण केले. त्या म्हणाल्या, “एक दिवसात नासणाऱ्या दुधात कधीही न नासणारे तूप लपलेले असते. त्याचप्रमाणे आपले मनही अथांग आहे. त्यात सकारात्मक विचार घालून सतत मंथन केले, तर आयुष्य समृद्ध होते.”तसेच “लोणीपासून बनवलेले तूप कधीही खराब होत नाही. अशीच स्त्रीच्या जन्माची कहाणी आहे. जन्मापासून ते तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिचे आयुष्य अखंड परिश्रम, त्याग आणि कर्तृत्वाने भरलेले असते.” भाषणाच्या शेवटी त्यांनी, “सण हे नेहमी भरभरून साजरे करा, तिळात गूळ मिसळा आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण करा,” असा सकारात्मक संदेश देत उपस्थित महिलांच्या मनाला स्पर्श केला.

आशाताई रंधे यांचे स्वागत करतांना सिमाताई रंधे व दिपाली सूर्यवंशी..
अध्यक्षीय भाषणात आशाताई रंधे यांनी मंडळाच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. “सर्वांनी असेच एकत्र येऊन समाजोपयोगी कार्य करत राहावे,” असे त्या म्हणाल्या.स्पर्धा परीक्षा आणि परीक्षण सुद्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि खूप समर्पक आणि आत्ताच्या गरजेचे प्रश्न विचारून साजरा झाला. नाव घेण्याच्या स्पर्धेत सुद्धा स्त्रियांनी कुठेच मागे बघितले नाही सर्वांनी त्यामध्ये आपला सहभाग अतिशय हसत खेळत नोंदविला. विशेष म्हणजे समाजातील जेष्ठ आणि सून मुली सर्वांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि वैशिष्ट्य म्हणजे खूप संख्येने सर्व स्त्रियांनी सहभाग घेतला. समाजातील ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्याला फाटा द्यावा म्हणजे आपला एक चांगला आदर्श समाजापुढे निर्माण होतो. सर्वांनी सुंदर असा हा कार्यक्रम केला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आपल्या समाजातील भगिनी दिवसभर कष्टाची कामे करूनही वेळ काढून अशा कार्यक्रमांना उपस्थित राहतात—त्यांचा हा उत्साह, समर्पण आणि सहभाग शब्दात मांडावा तितका कमीच आहे. अशा भगिनींचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
समाजातील महिलांची लक्षणीय उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. शेकडो महिलांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या शेवटी शिरपूर परीट महिला मंडळाच्या अध्यक्षा दिपाली सूर्यवंशी यांनी सर्व उपस्थितांचे, पाहुण्यांचे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.