खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
अमळनेर : विक्की जाधव.
खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांची विशेष सर्वसाधारण सभा शनिवार, ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी उत्साहात पार पडली. प्रारंभी गणसंख्या पूर्ण न झाल्याने सभा नियमानुसार तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर एका तासाने त्याच ठिकाणी सभा पुन्हा घेण्यात आली. या वेळी खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणूक २०२५ चा अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला, ज्यामुळे उपस्थित सभासदांमध्ये उत्सुकता व समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
या सभेचे अध्यक्षस्थान मावळते अध्यक्ष श्री. जितेंद्र झाबक यांनी भूषविले. निकाल जाहीर होताच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना श्री. झाबक यांच्या हस्ते निवड प्रमाणपत्रांचे वितरण करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणाऱ्या निवडणूक उपसमितीचे अध्यक्ष पंडित नाना चौधरी, सदस्य श्री. मनोहर महाजन, श्री. विवेक भांडारकर, प्रा. डॉ. सुनील गरूड तसेच कायदा सल्लागार अॅड. सुशील जैन व के. व्ही. कुलकर्णी यांचाही सन्मान करण्यात आला.
संपूर्ण सभा शांततामय व लोकशाही पद्धतीने पार पडली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, पारदर्शकता आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला. या निकालामुळे खानदेश शिक्षण मंडळाच्या पुढील वाटचालीकडे आशेने पाहिले जात असून, संस्थेच्या शैक्षणिक कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास सभासदांनी व्यक्त केला.