विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; अमळनेरच्या मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकरची जोरदार मागण
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील भद्रा प्रतीक मॉल परिसरातून कॉलेजकडे जाणारा तसेच रिलायन्स मॉलकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या वाहतुकीच्या प्रचंड वर्दळीमुळे धोकादायक ठरत आहे. या मार्गावर विविध क्लासेस व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची दिवसभर सतत ये-जा सुरू असते. वेगाने धावणारी वाहने, अरुंद रस्ता आणि नियंत्रणाविना असलेली वाहतूक यामुळे अपघाताची भीती वाढली असून, येथील सुजाण नागरिकांनी या ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली आहे.
अमळनेर–बेटावद मार्गे शिरपूरला जोडणारा हा महत्त्वाचा मुख्य रस्ता असल्याने मोठ्या वाहनांचीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलून येथे स्पीड ब्रेकर व आवश्यक वाहतूक नियंत्रण उपाययोजना कराव्यात, अशी एकमुखी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.