बारामतीत ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे दिमाखदार उद्घाटन
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या बारामती शहराने आज शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेतली आहे. विद्या प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या जागतिक दर्जाच्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (SP-CEAI)’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी (28 डिसेंबर) सकाळी 10 वाजता गदिमा सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडले. या केंद्राचे उद्घाटन विख्यात उद्योगपती व अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी डॉ प्रीती अदानी यांच्या हस्ते झाले.
या सोहळ्यामुळे बारामती आता केवळ राजकीय बालेकिल्ला न राहता, जागतिक तंत्रज्ञानाच्या ‘हब’ म्हणून नावारूपाला येत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
🔴पवार कुटुंब आणि अदानी एकाच मंचावर
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मंचावर उपस्थित असलेली दिग्गजांची मांदियाळी. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार हे सर्वजण एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले हे दृश्य महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे ठरले.
🔶“एआय शिकणारा तरुणच भविष्यात साक्षर” – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात भविष्यातील तंत्रज्ञानावर भर देताना सांगितले,
“येणारा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे. जो एआय शिकेल तोच खऱ्या अर्थाने साक्षर मानला जाईल. ग्रामीण भागात अशा अद्ययावत केंद्राची उभारणी करणारी विद्या प्रतिष्ठान ही देशातील पहिली संस्था आहे,” असा अभिमान त्यांनी व्यक्त केला.
यासोबतच त्यांनी अदानी समूहाच्या CSR उपक्रमांमुळे रोजगार निर्मितीला मिळालेल्या चालनेचे कौतुक केले.
🔶“तंत्रज्ञान कितीही प्रगत असले तरी माणुसकीला पर्याय नाही” – सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे यांनी तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांमधील समतोलावर भर दिला.
“कृत्रिम बुद्धिमत्ता माहिती देऊ शकते, पण संस्कार, मूल्ये आणि भावनिक आधार केवळ माणूसच देऊ शकतो. शिक्षकाची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही,” असे त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी अदानी कुटुंबाशी असलेल्या तीन दशकांच्या स्नेहसंबंधांचा उल्लेख करत, डॉ. प्रीती अदानी यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाचे विशेष कौतुक केले.
🔶ग्रामीण भारतासाठी शिक्षणाची नवी पहाट – शरद पवार
कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या केंद्राचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले,
“शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या गौतम अदानींचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. बारामतीसारख्या ग्रामीण भागात एआय केंद्र उभे राहिल्यामुळे हजारो तरुणांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवरच मिळणार आहेत.”
यावेळी अदानी समूह आणि विद्या प्रतिष्ठान यांच्यात एआय संशोधनासाठी सामंजस्य करार (MoU) झाल्याची घोषणा करण्यात आली.
🔶“बारामती देशासाठी दिशादर्शक” – गौतम अदानी
उद्घाटनप्रसंगी गौतम अदानी म्हणाले,
“काही ठिकाणे ही केवळ भौगोलिक नसतात, तर ती संघर्ष, परिश्रम आणि नेतृत्वाची प्रतीकं बनतात. बारामती हे त्यापैकीच एक आहे. शरद पवार यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्रासाठी केलेले कार्य देशासाठी दिशादर्शक आहे.”
🔹एआय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण केंद्र
‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ हे केंद्र
आर्टिफिशियल इंटेलिजन्स
मशीन लर्निंग
डेटा सायन्स
बिझनेस अॅनालिटिक्स
नवोन्मेष व स्टार्ट-अप संस्कृती
या क्षेत्रात विद्यार्थ्यांना, संशोधकांना व उद्योगजगताला एकत्र आणणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
🟢केंद्राची प्रमुख उद्दिष्टे
उद्योगाभिमुख एआय कौशल्यांचा विकास
संशोधन व नवोन्मेषाला चालना
उद्योग-संस्था सहकार्याद्वारे प्रत्यक्ष प्रशिक्षण
ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना समान संधी
🟤अत्याधुनिक सुविधा
या केंद्रात पुढील प्रयोगशाळा व सुविधा उपलब्ध असणार आहेत:
एआय व डेटा सायन्स प्रयोगशाळा
नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) प्रयोगशाळा
आयओटी, ड्रोन, एआर–व्हीआर प्रयोगशाळा
स्मार्ट सिटी व शाश्वत विकास प्रयोगशाळा
आरोग्य व हवामान कृती प्रयोगशाळा
क्वांटम एआय, 3D प्रिंटिंग
हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग व डेटा सर्व्हर
विद्यार्थ्यांसाठी इनक्युबेशन सेंटर
या केंद्राच्या माध्यमातून बारामतीने जागतिक तंत्रज्ञान नकाशावर आपली ठळक ओळख निर्माण केली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र खऱ्या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरणार आहे.
