स्पर्धा परीक्षेत संकल्पनांची स्पष्टता हाच यशाचा मंत्र – अॅड. चंद्रभान पाटील
अमळनेर : विक्की जाधव.
खान्देश शिक्षण मंडळ संचलित करिअर कौन्सिलिंग सेंटरमध्ये सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाच्या पाचव्या दिवशी विद्यार्थ्यांना सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळाले. अॅड. चंद्रभान पाटील (शिखर अकॅडेमी) यांनी राज्यशास्त्र व चालू घडामोडी या विषयावर मार्गदर्शन करताना, स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर संकल्पना समजून घेणे व त्या स्पष्ट होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. भारतीय राज्यघटना, घटनादुरुस्त्या, केंद्रीय व राज्यस्तरीय आयोग, विधिमंडळ व न्यायव्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवर त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य दिशा दाखवली. दुसऱ्या सत्रात डॉ. बालाजी कांबळे यांनी वाणिज्य व बँकिंग या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. सातत्य, नियमित उजळणी, दर्जेदार अध्ययन साहित्य आणि बी-प्लॅनचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. आरबीआयची कार्यपद्धती, बँकिंग रचना, अकाउंटिंग, आयकर व जीएसटी या विषयांवर पीपीटीच्या माध्यमातून सूक्ष्म व वस्तुनिष्ठ चर्चा करण्यात आली. या मार्गदर्शन वर्गास करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे यांच्यासह प्राध्यापकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा. विजय साळुंखे यांनी मानले.