अमळनेरच्या वैचारिक जडणघडणीचे आधारस्तंभ असलेल्या परमपूज्य साने गुरुजी आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांचा वारसा नेमका कुठे हरवला?
एक दिवस पुतळ्यावर पाणी मारून सत्ता मिळणार का?
अमळनेर : पत्रकार, विक्की जाधव.
खानदेश शिक्षण मंडळाची त्रिवार्षिक निवडणूक सध्या अमळनेर शहरातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. शिक्षण, समाजकारण आणि संस्थात्मक राजकारण यांचा अनोखा संगम असलेल्या या निवडणुकीमुळे शहरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त आणि संचालक पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून आश्वासनांचा पाऊस सुरू असून, “परिवर्तन”, “विकास” आणि जनतेचा आशीर्वाद “नवीन दिशा” हे शब्द अक्षरशः ओठांवर रेंगाळताना दिसत आहेत.

गेल्या अनेक दिवसापासून दुर्लक्षित असलेल्या धूळ खात पडलेल्या प्रताप शेठजी यांचा पुतळ्यावर एक दिवस पाणी मारून फोटोसेशन करताना..
मात्र या निवडणुकीच्या धामधुमीत एक प्रश्न प्रकर्षाने पुढे येतो आहे, अमळनेरच्या वैचारिक जडणघडणीचे आधारस्तंभ असलेल्या परमपूज्य साने गुरुजी आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांचा वारसा नेमका कुठे हरवला? आदर्श विज्ञानवादी शिक्षक, समाजवादी कवी आणि “खरा तो एकच धर्म मानवधर्म” असा संदेश देणाऱ्या साने गुरुजींचा अनेक दिवसांपासून धूळ खात असलेला पुतळा निवडणुकीच्या काळातच काही परिवर्तनवाद्यांना आठवणे, ही केवळ योगायोगाची बाब आहे की सोयीची स्मृती असा सवाल उपस्थित होत आहे. निवडणूक आली की मूल्यांची आठवण आणि निकालानंतर मात्र विस्मरण, हे चित्र दुर्दैवी ठरत आहे.

त्याचप्रमाणे, अमळनेरच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय जडणघडणीत प्रामाणिकपणे आपले आयुष्य वेचणारे श्रीमंत प्रताप शेठजी यांचा वैचारिक वारसा आज प्रताप कॉलेजच्या प्रांगणातही दिसेनासा झाला आहे. खानदेश शिक्षण मंडळाच्या माध्यमातून प्रताप कॉलेजचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या प्रताप शेठजींचे स्वप्न आज काही संचालकांच्या स्वार्थी राजकारणात झाकोळले जात आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. संस्थेचे नाव वापरून स्वतःची तिजोरी भरणाऱ्यांना आता सभासद नक्कीच नाकारतील, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
दरम्यान, अनेक दिग्गज स्वतः निवडून येणारच या आत्मविश्वासात आहेत, तर काही जण समाजाच्या मतदानावर विविध गणिते मांडत तर्कवितर्क लावत आहेत. “आम्हीच एका दिवसात परिवर्तन घडवू” अन आम्हालाच जनतेचा आशीर्वाद असा दावा करणारेही कमी नाहीत. मात्र खानदेश शिक्षण मंडळाचे सभासद, फेलो आणि व्हाइस पॅट्रन कोणाला संधी देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूणच, ही निवडणूक केवळ पदांची लढाई न राहता मूल्यांची, विचारांची आणि वारशाची कसोटी ठरणार आहे. साने गुरुजी आणि प्रताप शेठजी यांचा विसर पडलेल्या संचालकांना जनतेचे भान येते की नव्या विचारधारेच्या नेतृत्वाला संधी मिळते याकडे संपूर्ण अमळनेरचे लक्ष लागले आहे.
पुढील वृत्त लवकरच