मुलाच्या वाढदिवसानिमित्त हिरापूर सरपंच वाल्मिक पाटील यांचा संवेदनशील उपक्रम..
पारोळा (जि. जळगाव), दि. ३ डिसेंबर २०२५
जागतिक दिव्यांग दिनाच्याच दिवशी अमळनेर तालुक्यातील हिरापूरचे सरपंच श्री. वाल्मिक पाटील यांनी आपल्या चिरंजीव चार्विक याचा वाढदिवस अत्यंत हृद्य पद्धतीने साजरा केला. त्यांनी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित “परिश्रम” दिव्यांग मुला-मुलींची निवासी विशेष शाळा, पारोळा येथे भेट देऊन सर्व विशेष विद्यार्थ्यांसोबत आनंद सामायिक केला.याप्रसंगी सौ. नेहा वाल्मिक पाटील यांचीही उपस्थिती होती.शाळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शिक्षकांनी श्री. वाल्मिक पाटील व सौ. नेहा पाटील यांचा सपत्नीक रोप, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.श्री. वाल्मिक पाटील यांनी चि. चार्विकच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विशेष विद्यार्थ्यांसाठी मिठाई व चविष्ट भोजनासाठी पुरेसा किराणा सामान उपलब्ध करून दिला. विशेष मुलांनी एकत्र बसून मिठाई खाताना जो आनंद लुटला, तो पाहण्यासारखा होता.आपल्या मनोगतात श्री. वाल्मिक पाटील म्हणाले,
“अण्णासाहेब डॉ. योगेश महाजन सर व त्यांच्या संपूर्ण टीमचे हे कार्य खरोखरच डोळ्यात पाणी आणणारे आहे. या मुलांचे हसणे, त्यांचा आनंद पाहिला की खरा आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटते. मी समाजातील सर्वांना आवाहन करतो की, आपल्या मुलांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा कोणताही सण-उत्सव विशेष मुलांसोबत साजरा करा. त्यांचे प्रेम आणि हसू हेच खरे दान आहे.”या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, विशेष शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. विशेष विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललेले निरागस हसू आणि डोळ्यातील चमक पाहून सर्वांचेच डोळे पाणावले.अशा उपक्रमांमुळे समाजात दिव्यांग बांधवांप्रती प्रेम, आदर आणि संवेदनशीलता वाढत आहे.
श्री. वाल्मिक पाटील व सौ. नेहा पाटील यांचे मनःपूर्वक आभार!