अमळनेर तालुक्यात सतत पावसामुळे शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान; शासनाकडे भरपाईची मागणी.

अमळनेर : विक्की जाधव.
खरीप हंगाम 2025 दरम्यान पावसाच्या अनियमिततेमुळे अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चांगलीच अडचण झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात पावसाची सुरुवात झाली होती, मात्र त्यानंतर झालेल्या खंडामुळे रोपवाटिका व पेरणीला मोठा फटका बसला. जूनच्या शेवटी व जुलैच्या मध्यात पावसाने धडक दिली असली तरी सलग 22 दिवसांचा खंड बसल्याने मुग, उडीद, सोयाबीन आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि सप्टेंबरमध्येही मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. अनेक ठिकाणी पिके पडून गेली, तर काही ठिकाणी कीड व रोगराईने उत्पादनावर परिणाम झाला.

तसेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात (दि. 26 ते 28 ऑक्टोबर) झालेल्या सतत पावसामुळे शेतात उभे असलेले पिके पूर्णतः झोपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना योग्य तातडीची मदत मिळावी, अशी मागणी तहसीलदार कार्यालयाकडे करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी व प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.