२५ वर्षांनंतर ‘दहावी’चे विद्यार्थी पुन्हा एकत्र; भिगवणच्या भैरवनाथ विद्यालयात स्नेहमेळावा
(निलेश गायकवाड)
भिगवण येथील भैरवनाथ विद्यालयातील सन २०००-०१ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी २५ वर्षांनंतर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल १०३ विद्यार्थी या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
हलगीच्या गजरात कार रॅलीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेत आगमन होताच विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन आज आपापल्या क्षेत्रात यशस्वीरीत्या कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी २५ वर्षांपूर्वीच्या अनेक आठवणी व प्रसंग सांगितले. यातील काही आठवणी या भावनेतून काही विनोदी. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी शाळेला प्राचार्य कक्षेत १० खुर्च्या आणि कार्पेट असे ३० हजार रुपये किंमतीचे साहित्य भेट दिले.
या कार्यक्रमाला कोकाटे सर, बचुटे सर, मते सर, बनकर सर, थिटे सर, मिंड सर, बिराजदार सर, खरतोडे सर, जांबले सर, माने सर व प्राचार्य खराडे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या शिंदे आणि प्रतीक्षा गांधी यांनी केले, तर प्रास्ताविक महादेव बंडगर यांनी केले आणि आभार योगेश चव्हाण यांनी मानले. संदीप कुंभार, रोहन जाधव, अमोल गायकवाड, विक्रम देवकाते, आकाश उंडाळे, प्रकाश बंडगर, अमित वाघ, किशोर वाघ, शीला गाढवे, शुभांगी पलंगे, जयश्री धवडे, दिपाली मांढरे या माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.