संवादातून घडते व्यक्तिमत्वाची जडणघडण – डॉ. वासुदेव वले यांचे प्रतिपाद
अमळनेर : विक्की जाधव.
संवाद कौशल्य म्हणजेच यशाचा पाया असून आजच्या युगात मानवी नात्यांची सुसंवादाने जोडणी होणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. वासुदेव वले (पाचोरा) यांनी केले. खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर व राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागाच्या “अभिजात भाषा पंधरवडा” निमित्त आयोजित अतिथी व्याख्यानमालेत ते बोलत होते.

पूज्य साने गुरुजी सभागृहात पार पडलेल्या या व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांना संवादकौशल्याचे महत्त्व समजावताना सांगितले की, “जे बोलतात त्यांचे बोंड विकले जातात आणि जे बोलत नाहीत त्यांचे गहू सुद्धा विकले जात नाहीत.” आजच्या तंत्रयुगात यंत्रभाषेपेक्षा मानवी संवाद अधिक परिणामकारक ठरतो, असेही त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी संवादकौशल्य आत्मसात करून सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. गोपाल बडगुजर यांनी केले, अतिथींचा परिचय प्रा. तुषार पाटील यांनी करून दिला, तर आभार प्रा. सागर सैंदाणे यांनी मानले. या प्रसंगी डॉ. रमेश माने, डॉ. विलास गावीत, प्रा. योगेश पाटील आदी मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.