अमळनेर नगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत आज — इच्छुक नगरसेवकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण!
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या नजरा आज होणाऱ्या प्रभाग आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या उपस्थितीत आज, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नगरपरिषद सभागृहात ही सोडत काढण्यात येणार आहे. कोणाचा प्रभाग राखीव ठरणार आणि कोणाचा खुला राहणार, याकडे इच्छुक नगरसेवक व समर्थकांची उत्सुकतेने नजर आहे.

यावर्षी अनुसूचित जातीसाठी ३ पैकी २ महिला, अनुसूचित जमातीसाठी २ पैकी १ महिला, तर मागास प्रवर्गासाठी १० पैकी ५ महिला जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. सर्वसाधारण २१ प्रभागांपैकी १० महिला आरक्षण निश्चित केले जाणार आहे. आरक्षणाची प्राथमिक यादी उद्या ९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होईल, तर हरकती १४ ऑक्टोबरपर्यंत स्वीकारल्या जाणार असून २८ ऑक्टोबरला अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे. आरक्षण प्रक्रिया ही शून्य निवडणूकपासून गृहीत धरली जात असून, लोकसंख्येच्या प्रमाणावर प्रभागनिहाय आरक्षण उतरत्या क्रमाने निश्चित केले जाईल. प्राथमिक अंदाजानुसार प्रभाग क्र. ४, ६ आणि २ अनुसूचित जातीसाठी, तर प्रभाग ३ आणि १८ अनुसूचित जमातीसाठी राखीव निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागासवर्गीय लोकसंख्येच्या बदलानुसार या प्रभागात थोडेफार फेरबदल होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आजची सोडत अमळनेरच्या राजकारणाचा दिशा ठरवणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.