प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात गांधी विचार शिबिर — सत्य, अहिंसा व स्वावलंबनाचे प्रबोधन..
विद्यार्थ्यांमध्ये गांधी तत्त्वज्ञान रुजविण्याचा अनोखा उपक्रम अमळनेरमध्ये
अमळनेर : विक्की जाधव
महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्र, विचारधारा प्रशाळा, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि राष्ट्रीय सेवा योजना, प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात “एक दिवसीय गांधी विचार शिबिर” संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन प्रतिमा पूजनाने झाले असून प्रमुख अतिथी म्हणून हनुमंत पवार (पुणे) यांची उपस्थिती लाभली.

आपल्या प्रबोधनपर व्याख्यानात पवार यांनी महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा, स्वावलंबन आणि ग्रामस्वराज्य या तत्त्वज्ञानावर सखोल प्रकाश टाकत आजच्या काळातील त्याचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना गांधी विचार आत्मसात करून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे आवाहन केले. तसेच विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी गांधी तत्त्वज्ञानाचे समकालीन सामाजिक आणि नैतिक संदर्भ स्पष्ट केले.शिबिरात प्रताप महाविद्यालयासह धनदाई, समाजकार्य आणि मारवड महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिराचे समन्वयक प्रा. डॉ. हेमंत पवार होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक खरात यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. व्हि. एम. रोकडे यांनी केले. राष्ट्रगीताने या शिबिराची सांगता झाली.