बालविवाहाच्या भस्मासुराचे दहन करा – प्रांताधिकारी मुंडावरे यांचे आवाहन.
अमळनेर : विक्की जाधव.
बालविवाह हा समाजातील मोठा घातक भस्मासूर असून त्यातून अनेक सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असूनही अजूनही अशिक्षण आणि छुप्या पद्धतीमुळे अशा विवाहांना चालना मिळते, हे दुःखद आहे. नुकत्याच भिलाली येथे झालेल्या घटनेनंतर मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा प्रकार निंदनीय असल्याचे प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी स्पष्ट केले. बालविवाह रोखण्यासाठी समाज, प्रशासन आणि पुरोहित यांचे सामूहिक योगदान आवश्यक आहे, असेही त्यांनी आवाहन केले.जागतिक बालविवाह निर्मूलन सप्ताह ‘जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन’ अंतर्गत आधार बहुउद्देशीय संस्था, मंगळग्रह सेवा संस्था व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळग्रह मंदिर परिसरात जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास प्रांताधिकारी मुंडावरे यांच्यासह विविध संस्था, पुरोहित संघाचे प्रतिनिधी व समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सर्वांनी बालविवाह निर्मूलनासाठी सक्रिय भूमिका बजावण्याची शपथ घेतली.

या जनजागृती उपक्रमात प्रफुल्ल जोशी, मंदार कुलकर्णी, दिलीप बहिरम आणि भरत पाटील यांनीही विचार व्यक्त करत समाजातील सजगतेची गरज अधोरेखित केली. पुरोहित संघाचे सहकार्य, सामाजिक जाणिव आणि प्रशासनाची ठाम भूमिका असे त्रिसूत्री प्रयत्नच बालविवाह निर्मूलनात प्रभावी ठरतील, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मोहिनी धनगर यांनी केले.