प्रताप महाविद्यालयात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा – विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी.
अमळनेर : विक्की जाधव.
खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दिनांक १५ व १६ सप्टेंबर २०२५ रोजी पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) आणि करिअर कौन्सलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील २५ हून अधिक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला आहे. प्रवेश निःशुल्क असून स्पर्धेची अंतिम तारीख १३ सप्टेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन प्रताप महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व नंदुरबार जिल्हा सांख्यकीय अधिकारी मा. विनोद धनगर यांच्या हस्ते होणार असून समारंभाचे अध्यक्षस्थान कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी भूषविणार आहेत. दोन दिवसीय या स्पर्धेत पहिल्या दिवशी प्राथमिक फेरी होईल तर दुसऱ्या दिवशी अंतिम फेऱ्यांनंतर विजेत्यांचा सत्कार समारोप समारंभात सीए नीरज अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली केला जाईल.विजेत्यांना प्रथम पारितोषिक रुपये १०,०००, द्वितीय रुपये ७,०००, तृतीय रुपये ५,००० तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे, स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे संयोजक डॉ. ज्ञानेश्वर मराठे, संयोजिका प्रा. वैशाली राठोड आणि करिअर कौन्सलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे यांनी विद्यार्थ्यांना या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषेत उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.