प्रा. ज्ञानेश्वर कांबळे यांना डॉक्टरेट पदवी – साहित्य अभ्यासातील उल्लेखनीय यश..
अमळनेर : विक्की जाधव.
प्रताप महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर दत्तात्रय कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या ऑनलाइन वायवामध्ये प्रा. कांबळे यांनी ‘प्रदीप म्हसेकर यांचे साहित्य : एक अभ्यास’ या विषयावरील आपले संशोधन प्रभावीपणे सादर केले. या संशोधन कार्यासाठी त्यांना डॉ. बालाजी नागटिळक यांचे मार्गदर्शन लाभले.

या वायव्यात डॉ. दासू वैद्य अध्यक्षस्थानी होते, तर बाह्य परीक्षक म्हणून बुलढाणा येथील प्राचार्य डॉ. गोविंद गायकी यांनी काम पाहिले. प्रा. कांबळे यांच्या या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, प्रताप महाविद्यालयाचे प्राध्यापकवर्ग, विविध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन केले. प्रा. कांबळे यांच्या संशोधनाने मराठी साहित्यातील अभ्यासाला एक नवी दिशा दिल्याचे गौरवोद्गार विविध मान्यवरांनी काढले. त्यांच्या या यशामुळे प्रताप महाविद्यालय तसेच संपूर्ण अमळनेर परिसरात आनंदाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांसाठी हे एक प्रेरणादायी पाऊल ठरले आहे.