ऊस पिकातील लोकरी मावा नियंत्रणावर शेतकरी, कृषीकन्या यांच्या उपस्थितीत चर्चासत्र संपन्न…
.
बारामती ( सह-संपादक- संदिप आढाव)
.
सध्याच्या काळात ऊस पिकाला भेडसावणारी एक मोठी समस्या म्हणजे लोकरी मावा. या किडीच्या प्रादुर्भावामुळे ऊस उत्पादनात मोठी घट येत असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या गंभीर समस्येवर उपाययोजना शोधण्यासाठी कृषी महाविद्यालय बारामती च्या महाविद्यालयातील कृषी कन्यांच्या वतीने एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कृषी कन्या
ज्ञानेश्वरी गायकवाड, सनिका गवळी , सृष्टि गावडे, प्रगती कदम , प्रतीक्षा जंजिरे, स्वस्तिका पाटील , गायत्री चव्हाण .या चर्चासत्रात शेतकरी सहभागी झाले होते.
यावेळी शरद दळवी, संदीप गायकवाड,समिर बुरुंगले, संतोष मोरे,ए.डी.आर.कृषी महाविद्यालय बारामती यांचे मार्गदर्शन चर्चासत्रासाठी उपयोगी ठरले.
१) चर्चासत्रातील मुख्य मुद्दे:
लोकरी माव्याच्या जीवनाविषयी आणि ऊस पिकावर होणाऱ्या त्याच्या नुकसानीबद्दल माहिती दिली. लोकरी मावा कसा पसरतो, पिकाची वाढ कशी खुंटते आणि साखर उताऱ्यावर त्याचा काय परिणाम होतो, यावर सविस्तर चर्चा झाली. यानंतर, नियंत्रणाच्या उपायांवर भर देण्यात आला.
२) जैविक नियंत्रणावर भर:
रासायनिक कीटकनाशकांचा वापर तात्पुरता दिलासा देत असला तरी, त्याचे पर्यावरणावर आणि जमिनीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो त्यामुळे लोकरी मावा नियंत्रणासाठी जैविक उपायांवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन करण्यात आले. या उपायांमध्ये खालील बाबींचा समावेश होता:
३) मित्र किटकांचे संवर्धन: क्रायसोपर्ला, मायक्रोमस, लेडीबर्ड बीटल यांसारख्या मित्र किटकांच्या अळ्या आणि अंडी शेतात सोडून माव्याचा नैसर्गिकरीत्या नायनाट करता येतो.
४) कडुनिंबावर आधारित फवारणी: कडुनिंबाचे तेल (५ मि.लि. प्रति लिटर पाणी) आणि साबणाचे पाणी यांचे मिश्रण फवारल्याने लोकरी माव्यावर नियंत्रण मिळवता येते. १० दिवसांच्या अंतराने ही फवारणी करणे परिणामकारक ठरते.
* अन्य उपाय: कमी पाण्यात शेती करणे, पट्टा किंवा रुंद सरी पद्धतीने ऊस लागवड करणे, रोगग्रस्त बेणे न वापरणे आणि शेतातील तण वेळीच काढणे यांसारखे उपाय देखील महत्त्वाचे आहेत.